पर्थ – सलामीवीर डेव्हीड वॉर्नर याने फटकावलेल्या दमदार दीडशतकी खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या दिवस अखेर आपल्या पहिल्या डावात ५ बाद ३४६ अशी भक्कम मजल मारली आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नरने पहिल्याच षटकापासून आपले इरादे स्पष्ट केले. त्याने उस्मान ख्वाजासह संघाला शतकी सलामी दिली. ख्वाजा चांगला खेळत असताना ४१ धावांवर बाद झाला. त्यानंतर वॉर्नरने मार्नस लेबुशेनसह संघाचे दीडशतक फलकावर लावले. लेबुशेन १६ धावांवर परतला. यावेळी वॉर्नरने स्टीव्ह स्मिथसह संघाचा डाव सावरताना आपले अर्धशतक पूर्ण केले.
Davey’s day.
RECAP: https://t.co/gDTz4xJ5MS #AUSvPAK pic.twitter.com/8R2DETM0vz
— cricket.com.au (@cricketcomau) December 14, 2023
स्मिथही आत्मविश्वासाने फलंदाजी करत होता. या जोडीने संघाचे द्विशतक फलकावर लावले. स्थिरावलेला स्मिथ ३१ धावांवर परतला. दरम्यान वॉर्नरने आपले शतक साकार केले. ट्रेव्हीस हेडनेही वॉर्नरला सुरेख साथ देत संघाचे त्रिशतक फलकावर लावले.
वॉर्नरने दीडशतकी पल्लाही पार केला. त्याचवेळी हेड ४० धावांवर बाद झाला. पाठोपाठ वॉर्नरचाही संयम सुटला व त्यानेही अनावश्यक फटका मारत आपली विकेट बहाल केली. त्याने १६४ धावांच्या खेळीत २११ चेंडूंचा सामना करताना १६ चौकार व ४ षटकार फटकावले. तो परतल्यावर मिचेल मार्श व अलेक्स केरी यांनी उरलेली षटके खेळून काढताना आणखी नुकसान होऊ दिले नाही. खेळ थांबला तेव्हा मार्श १५ तर केरी १४ धावांवर खेळत होता. पाकिस्तानकडून अमर जमालने सर्वादिक २ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – ८४ षटकांत ५ बाद ३४६ धावा. (डेव्हीड वॉर्नर १६४, उस्मान ख्वाजा ४१, ट्रेव्हीस हेड ४०, स्टीव्ह स्मिथ ३१, मिचेल मार्श खेळत आहे १५, अलेक्स केरी खेळत आहे १४, अमर जमाल २-६३).