Stumps on Day 1 of the IND vs ENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून सुरू झाला आहे. भारतीय संघ सध्या 0-1 ने पिछाडीवर आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारत मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे खेळली जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात सहा गडी गमावून 336 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल 179 धावांवर नाबाद असून रविचंद्रन अश्विन पाच धावांवर नाबाद आहे.
Yashasvi Jaiswal’s excellent 179* guided India on day one of the second #INDvENG Test 🔥#WTC25: https://t.co/i3GiP6k0Qw pic.twitter.com/vZFOx0zxnB
— ICC (@ICC) February 2, 2024
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली होती. रोहितने यशस्वीसह पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. तो 14 धावा करून बाद झाला. यानंतर यशस्वीने शुभमन गिलसह दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. शुभमन पुन्हा एकदा फ्लॉप झाला आणि 34 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार मारले.
श्रेयस अय्यर 27 धावा करून झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी श्रेयसने यशस्वीसोबत 90 धावांची भागीदारी केली. कसोटी पदार्पण करणारा रजत पाटीदारने 32 धावांची खेळी केली आणि तो दुर्दैवाने बाद झाला. त्याने यशस्वीसोबत 70 धावांची भागीदारी केली. वास्तविक, रजतने रेहान अहमदच्या चेंडूचा बचाव केला. चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि स्टम्पकडे गेला. रजतने पायाच्या साह्याने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत चेंडू विकेटला(स्टम्पला) लागला होता. आऊट झाल्यानंतर रजत खूपच निराश दिसत होता.
त्यानंतर यशस्वीने अक्षरसोबत 52 धावांची भागीदारी केली. अक्षरने 27 धावा केल्या. तर श्रीकर भरत 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सध्या यशस्वीने 179 धावांच्या खेळीत 17 चौकार आणि पाच षटकार मारले आहेत. भारतीय संघ शनिवारी 400+ धावा करू इच्छितो. इंग्लंडकडून गोलंदाजीत आतापर्यंत शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले आहेत. त्याचबरोबर जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टले यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली आहे.