इंदुर – यजमान भारतीय संघाविरुद्ध येथे झालेला तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला. आता बॉर्डर-गावसकर करंडकातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना अहमदाबादला होणार असून त्यातच या मालिकेचा निर्णय लागणार आहे. या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांची गरज होती ती त्यांनी एक गडी गमावून पूर्ण केली.
या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर भारताचा डाव अवघ्या 109 धावांत आटोपला. त्यानंतर भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचीही वाताहत झाली व त्यांचा पहिला डाल 197 धावांवर संपूष्टात आला. मात्र, तरीही त्यांना पहिल्या डावात 88 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. त्यानंतर भारताने आपला दुसरा डाव सुरु केल्यावर चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक तर श्रेयस अय्यरच्या उपयुक्त फलंदाजीमुळे भारताला दुसऱ्या डावात 163 धावांची मजल मारता आली. यावेळी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांची गरज होती.
Jasprit Bumrah injury update : बुमराहवर न्यूझीलंडमध्ये होणार उपचार; किमान पाच महिने…
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. डावातील पहिल्याच षटकात रवीचंद्रन अश्विनने उस्मान ख्वाजाला बाद करत भारतीय गोटात आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, त्यानंतर ट्रेव्हिस हेड आणी मार्नस लेबुशेन यांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी करत संघाचा विजय साकार केला. हेड 53 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावताना 49 धावांवर नाबाद राहिला. लेबुशेनने नाबाद 28 धावांची खेळी करताना 58 चेंडूत 6 चौकार फटकावले. या कसोटीत दोन्ही डावांत मिळून 11 गडी बाद करणारा ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पीन गोलंदाजा नाथन लॉयन सामन्याचा मानकरी ठरला.
अडीच दिवसांतच निकाल
नागपूर व दिल्लीला झालेल्या कसोटींप्रमाणे ही तिसरी कसोटीही अवघ्या अडीच दिवसांतच संपली. या तिनही कसोटी सामन्यांसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्ट्यावर आता प्रचंड टीका होत आहे. या सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी आखाडा असल्याचीच टीका सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच सुरु होती. त्यातच येत्या 9 ते 13 मार्च या कालावधीत अहमदाबादमध्ये या मालिकेतील चौथी व अखेरची कसोटी होत आहे. त्यातील निकालच या मालिकेचा निर्णय स्पष्ट करणारा ठरेल. मात्र, चौथा कसोटी सामना तरी पाच दिवस चालेल का असाही प्रश्न आता निर्माण होत असून त्यासाठी कशी खेळपट्टी तयार केली जाणार याचीच उत्सूकता लागली आहे.
Australia win the Third Test by 9 wickets. #TeamIndia 🇮🇳 will aim to bounce back in the fourth and final #INDvAUS Test at the Narendra Modi Stadium in Ahmedabad 👍🏻👍🏻
Scorecard ▶️ https://t.co/t0IGbs2qyj @mastercardindia pic.twitter.com/M7acVTo7ch
— BCCI (@BCCI) March 3, 2023
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – सर्वबाद 109 धावा. ऑस्ट्रेलिया पहिला डाव – सर्वबाद 197 धावा. भारत दुसरा डाव – सर्वबाद 163 धावा. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 18.5 षटकांत 1 बाद 78 धावा. (ट्रेव्हिस हेड नाबाद 49, मार्नस लेबुशेन नाबाद 28, रवीचंद्रन अश्विन 1-44).