वाघोली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करणाऱ्या वाघोली येथील तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सारिका किरण पवार यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. अनेक वर्षांपासून महिलांचे संघटन करून बचतीची सवय लावून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी सारिका पवार यांचे कार्य सुरू आहे.
तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरावर अनेक पथदर्शी उपक्रम त्यांनी राबवले आहेत. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ‘दैनिक प्रभात’च्या वतीने देखील त्यांना प्रभात नारी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सामाजिक क्षेत्रातल्या कार्याची दखल म्हणून त्यांना डॉक्टरेट ही पदवी देखील मिळाली आहे.
याशिवाय अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित देखील केले आहे. मुंबई येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हाती भगवा ध्वज घेत त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या प्रसंगी राज्य सचिव संजय मोरे, मंदाकिनी पाटील, किशोरी चव्हाण, अलका कुलकर्णी, मंदाकिनी सोलंकी, नीर्जा सातारकर, आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य महिलांना संघटित करून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्यांचे शासन दरबारी असणारे विविध प्रश्न तातडीने सोडविण्यात येणार आहे.” -डॉ. सारिका किरण पवार, नेत्या शिवसेना