#CWC19 : न्यूझीलंडला आज ऑस्ट्रेलियाविरूध्द विजय अनिवार्य

स्थळ – लॉर्डस मैदान, लंडन
वेळ-सायं. 6 वा.

लंडन – विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाने येथील विश्‍वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरी निश्‍चित केली आहे. त्यांच्यापाठोपाठ बाद फेरीसाठी उत्सुक असलेल्या न्यूझीलंडला आणखी एक गुणाची आवश्‍यकता आहे. त्यासाठी त्यांना आज विजय मिळविणे अनिवार्य आहे. या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीत अनेक वेळा कांगारूंचेच पारडे जड राहिले आहे.

या स्पर्धेत न्यूझीलंडची अपराजित्वाची मालिका पाकिस्तानने खंडित केली आहे. या सामन्यात पाकिस्तानने सहज विजय मिळविताना न्यूझीलंडच्या अनेक उणिवा स्पष्ट केल्या आहेत. न्यूझीलंडच्या पहिल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी अपेक्षेइतकी झालेली नाही. त्यांचा कर्णधार केन विल्यमसन याने या स्पर्धेत आतापर्यंत दोन शतके केली आहेत. तो लवकर बाद झाला की त्यांच्या संघास तीनशे धावांचा पल्ला गाठण्यात अडचणी येतात असेच चित्र आहे.

रॉस टेलर, जेम्स नीशाम व कॉलिन डी ग्रॅंडहोम यांनी थोडीफार चमक दाखविली असली तरी निर्णायक लढतीत त्यांच्या खेळात सातत्य नव्हते. या फलंदाजांच्या गुणदोषांचा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सखोल अभ्यास आहे. त्यामुळेच विल्यमसन याला लवकर बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन व मिचेल सॅंटनर यांच्यावर जरी न्यूझीलंडची मुख्य मदार असली तरी पाकिस्तानचे फलंदाज डोईजड झाल्यानंतर विल्यमसन याने स्वत:च गोलंदाजी केली होती व त्याला एक विकेटही मिळाली होती.

सॅंटनर हा किफायतशीर गोलंदाज असला तरी त्याने विकेट्‌सही घेतल्या पाहिजेत अशी त्यांच्या संघ व्यवस्थापनाची अपेक्षा असणारच. डेव्हिड वॉर्नर याने पाचशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याच्याबरोबरच कर्णधार ऍरोन फिंच यालाही सूर गवसला आहे. त्याच्याबरोबरच स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, नॅथन कोल्टिअर नील, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्‍सवेल यांच्यावरही त्यांच्या फलंदाजीची मदार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, जेसन बेहनड्रॉफ, अलेक्‍स केरी (यष्टीरक्षक), नॅथन कोल्टिअर नील, पॅट कमिन्स, नॅथन लायन, ग्लेन मॅक्‍सवेल, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, ऍडम झंपा.

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्तील, मॅट हेन्री, कॉलिन मुन्रो, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सॅंटनर, इश सोधी, टीम साऊदी.

Leave A Reply

Your email address will not be published.