#AUSvIND 1st T20 : भारताची अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी

पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात

कॅनबेरा – लेग स्पीनर यजुवेंद्र चहल व नवोदित यॉर्करकिंग टी. नटराजन यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव केला व विजयी सलामी दिली. 

टी-20 क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने सातत्याने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले असल्याचे याही सामन्यात सिद्ध झाले. तसेच दुखापतीमुळे जायबंदी झालेल्या खेळाडूच्या जागी बदली खेळाडूला परवानगी देण्याच्या आयसीसीच्या नियमाचा लाभही भारतीय संघाला झाला. फलंदाजी करताना रवींद्र जडेजाला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी यजुवेंद्र चहलला बदली खेळाडू म्हणून या सामन्यात खेळता आले. तसेच हा बदली खेळाडू फलंदाजी तसेच गोलंदाजीही करू शकतो हा आयसीसीचा नवा नियमही भारताच्या पथ्यावर पडला. त्यानेच यजमान संघाची दाणादाण उडवली.

विजयासाठी भारताने दिलेल्या 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 20 षटकांत 7 बाद 150 असा रोखला गेला व भारताने हा सामना 11 धावांनी जिंकला.

कर्णधार फिंच व नवोदित आर्सी शॉर्ट यांनी 56 धावांची सलामी दिली. कर्णधार विराट कोहलीने चहलकडे चेंडू सोपवला व चमत्कार घडला. त्याने आधी फिंचला तर, त्यानंतर स्टिव्ह स्मिथलाही बाद करत भारताच्या मार्गातील मोठे अडसर दूर केले. त्यानंतर नटराजन व दीपक चहर यांनी यजमान संघाच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. नटराजनने ग्लेन मॅक्‍सवेलला बाद केले व त्याचवेळी सामना भारताच्या बाजूने फिरला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 70 अशी बनली होती. मात्र, शॉर्टने मोझेस हेन्रीक्‍सच्या साथीत संघाचा डाव सावरताना संघाचे शतक फलकावर लावले.

शॉर्ट डोईजड होत असतानाच नटराजनने त्याला बाद केले व संघाचा विजय दृष्टिपथात आणला. त्यानंतर चहलने मॅथ्यू वेडला बाद केले व यजमानांची स्थिती आणखी बिकट केली. दीपक चहरने हेन्रीक्‍सला बाद केले व भारताचा विजय निश्‍चित केला. भारताकडून नटराजन व चहल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. चहरने एक बळी मिळवला.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. या पहिल्याच टी-20 सामन्यात सलामीवीर लोकेश राहुलचे अर्धशतक व रवींद्र जडेजाने तळात केलेल्या आक्रमक फलंदजीमुळे भारताला 7 बाद 161 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार विराट कोहलीसह प्रमुख फलंदाजांनी नांगी टाकल्याने संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

भारताच्या डावाची सुरुवात राहुल व शिखर धवन यांनी केली. मात्र, धवन पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यानंतर आलेल्या कर्णधार कोहलीनेही निराशा केली. त्याला केवळ 9 धावाच करता आल्या. कोहलीच्या जागी आलेल्या संजू सॅमसनने संघात स्थान मिळाल्याची संधी वाया घालवली. त्याने सुरुवात चांगली केली. मात्र, अनावश्‍यक आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात तो 23 धावांवर बाद झाला. यावेळी मनीष पांडेलाही चमक दाखवण्यात यश आले नाही. तो केवळ दोन धावा करून बाद झाला.

दरम्यान, राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो लगेचच बाद झाला. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात वादळी फलंदाजी केलेल्या हार्दिक पंड्याला देखील प्रभाव पाडता आला नाही. त्यावेळी 17 व्या षटकात भारताची अवस्था 6 बाद 114 अशी बिकट बनली होती. अखेरच्या एकदिवसीय सामन्याचा हिरो ठरलेल्या रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची साक्ष देताना अवघ्या 23 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 44 धावांची खेळी केली व संघाला दीडशतकी धावांच्या पुढे मजल मारून दिली.

संक्षिप्त धावफलक

भारत – 20 षटकांत 7 बाद 161 धावा. (लोकेश राहुल 51, संजू सॅमसन 23, रवींद्र जडेजा नाबाद 44, दीपक चहर नाबाद 0, मोझेस हेन्रीक्‍स 3-22, मिशेल स्टार्क 2-34). ऑस्ट्रेलिया – 20 षटकांत 7 बाद 150 धावा. (ऍरन फिंच 35, आर्सी शॉर्ट 34, मोझेस हेन्रीक्‍स 30, यजुवेंद्र चहल 3-25, टी. नटराजन 3-30).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.