“कडाक्‍याच्या थंडीत शेतकऱ्यांनी मोदी सरकारला घाम फोडला”

उद्या संपूर्ण देश पेटला तर काय होईल?

मुंबई – दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कडाक्‍याच्या थंडीतही पंजाबच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला घाम फोडला आहे. आंदोलन मागे घ्यायचे सोडाच, पण ते अधिक जहाल आणि तीव्र होताना दिसत आहे, असे निरीक्षण शिवसेनेकडून नोंदवण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन बदनाम करण्याच्या मोहिमा राबवल्या गेल्या. पण, त्या भाजपच्या आयटी सेलवरच उलटल्या. मागील सहा वर्षांत सुपरमॅन मोदी सरकारची अशी भयंकर कोंडी आणि फजिती कधीच झाली नव्हती, अशी शाब्दिक फटकेबाजी शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका हातात जादूची छडी, तर दुसऱ्या हातात चाबूक असल्याने ते कुणालाही झुकवू शकतात, असा गैरसमज आहे. तो पंजाबच्या शेतकऱ्यांनी खोटा ठरवला आहे. त्यांच्यापुढे सीबीआय, ईडी या सरकारच्या नेहमीच्या हत्यारांचे काहीच चालत नाही. उलट, शेतकऱ्यांनी मोदी सरकारला गुडघ्यावर आणले आहे.

आता तरी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकायला हवे. आज पंजाब खवळलायं. उद्या संपूर्ण देश पेटला तर काय होईल, असा प्रश्‍न करून शिवसेनेने मोदी सरकारला इशारा दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.