AUS-W Vs IND-W Test Highlights : भारतीय महिला क्रिकेट संघाची कसोटीतील उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. इंग्लंडपाठोपाठ आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धही विजय मिळवला आहे. महिला क्रिकेटमध्ये भारताने मुंबईत खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने इतिहास रचला आहे. भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिला कसोटी विजय आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताला पहिला विजय मिळाला आहे. दोन्ही संघांमध्ये 1977 पासून आतापर्यंत 11 कसोटी सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. सहा कसोटी अनिर्णित राहिल्या आणि आता भारताला एक विजय मिळाला.
भारताने पहिल्या डावात 406 धावा केल्या होत्या त्यानंतर ऑस्ट्रेलियाला भारतानं पहिल्या डावात 219 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे टीम इंडियाकडे पहिल्या डावात 187 धावांची आघाडी होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला पुन्हा भारतीय संघानं दुसऱ्या डावात 261 धावांवर गुंडाळलं.
त्यानंतर भारतासमोर 75 धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य भारतीय महिला संघानं दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय साकारला. स्मृती मंधानाने दुसऱ्या डावात भारताकडून सर्वाधिक नाबाद 38 धावा केल्या. रिचा अंजनाने 13 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज 12 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. शेफाली वर्माला केवळ चार धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून किम गर्थ आणि ऍशले गार्डनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Vice-Captain Smriti Mandhana hit the winning runs as #TeamIndia register a 8⃣-wicket win over Australia in Mumbai 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/7o69J2XRwi#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/FiJorgZUMs
— BCCI Women (@BCCIWomen) December 24, 2023
स्नेह राणा ठरली सामनावीर….
भारताची अनुभवी खेळाडू स्नेह राणा हिला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. स्नेहने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात चार बळी घेतले. फलंदाजी करताना तिने पहिल्या डावात नऊ धावा केल्या. या काळात तिने 57 चेंडूंचा सामना करत स्मृती मंधानाला चांगली साथ दिली. तिने स्मृतीसोबत पहिल्या डावात दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली होती.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव..
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ 261 धावा करून गडगडला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ताहिला मॅकग्रा 73 धावा करून बाद झाली, एलिस पॅरी 45 आणि बेथ मुनी 33 धावा करून बाद झाल्या. एलिसा हिलीने 32 आणि फोबी लिचफिल्डने 18 धावा केल्या. कांगारू संघाला खेळाच्या चौथ्या दिवशी पहिला धक्का ऍशले गार्डनरच्या रूपाने बसला. 27 चेंडूत सात धावा करून ती बाद झाली. पूजा वस्त्राकरच्या चेंडूवर ती एलबीडब्ल्यू झाली. तिच्यानंतर अॅनाबेल सदरलँड 27 धावा करून स्नेह राणाची शिकार झाली. त्यानंतर स्नेहने एलाना किंगला (0) क्लीन बोल्ड केले. राजेश्वरी गायकवाडने लॉरेन चीटलला (चार धावा) बाद करून ऑस्ट्रेलियाला नववा धक्का दिला. गायकवाडने अॅशले गार्डनरला (नऊ धावा) बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. भारताकडून गोलंदाजीत दुसऱ्या डावात स्नेह राणाने चार विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाड आणि हरमनप्रीत कौर यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. पूजा वस्त्राकरने एक विकेट घेतली.
FIFA Club World Cup 2023 : मँचेस्टर सिटी क्लब ठरला विश्वकरंडकाचा विजेता…
पहिल्या डावात दोन्ही संघांची कामगिरी…
याआधी भारताने पहिल्या डावात 406 धावा केल्या होत्या तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडे पहिल्या डावात 187 धावांची आघाडी होती. भारताकडून पहिल्या डावात दीप्ती शर्माने 78 धावा, स्मृती मानधनाने 74 धावा, जेमिमाह रॉड्रिग्जने 73 धावा आणि ऋचा घोषने 52 धावा केल्या. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात ताहिला मॅकग्राने 50 आणि बेथ मूनीने 40 धावा केल्या. भारताकडून पहिल्या पूजा वस्त्राकरने चार आणि स्नेह राणाने तीन बळी घेतले.