जेद्दाह, (सौदी अरेबिया) – अर्जेंटिनाच्या ज्युलियन अल्वारेझच्या दोन उत्कृष्ट गोलांमुळे मँचेस्टर सिटीने क्लब विश्वकरंडकाचे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी फायनलमध्ये ब्राझीलच्या फ्लुमिनेन्स संघाचा ४-० असा पराभव केला. शुक्रवारी झालेल्या अंतिम फेरीतील विजयासह सिटीने यंदाचे पाचवे विजेतेपद पटकावले. अल्वारेझशिवाय फिल फोडेनने ७२व्या मिनिटाला सिटीसाठी गोल केला. त्याचवेळी निनोने फ्लुमिनन्ससाठी आत्मघातकी गोलही केला.
पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली मँचेस्टर सिटी संघाने स्टार स्ट्रायकर एर्लिंग हॅलँड आणि मिडफिल्डर डी ब्रुयनशिवाय या सामन्यात प्रवेश केला. सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या ४० सेकंदात अल्वारेझने सिटीसाठी पहिला गोल केला. क्लब वर्ल्ड फायनलच्या इतिहासातील हा सर्वात जलद गोल ठरला. त्याच्या गोलमुळे सिटी चाहत्यांना आनंदाची संधी मिळाली.
यानंतर २७व्या मिनिटाला फ्लुमिनेन्सच्या निनोने फिल फोडेनचा फटका रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू त्याच्या पायाला लागून गोल पोस्टमध्ये गेला. यानंतर ७२ व्या मिनिटाला अल्वारेझच्या पासवर फोडेनने शानदार गोल केला. त्यानंतर अल्वारेझने ८८व्या मिनिटाला दुसरा आणि सिटीसाठी चौथा गोल केला. सिटीने यावर्षी चॅम्पियन्स लीग, ईपीएल, एफए कप आणि यूईएफए सुपर कप विजेतेपदे जिंकली आहेत. शुक्रवारी फ्लुमिनेन्सवर विजय मिळवून २०२३ मधील हे त्यांचे पाचवे विजेतेपद ठरले.
पुढील स्पर्धेत युरोपधील १२ संघ
क्लब विश्वकरंडक ही स्पर्धा २००५ मध्ये सुरू झाली, परंतु मागील १९ आवृत्त्यांमध्ये, युरोपियन आणि दक्षिण अमेरिकन संघांमध्ये १३ वेळा अंतिम सामने झाले आहेत. परंतु आता फिफाकडून पुढील वर्षापासून या स्पर्धेत काही बदल केले जाणार आहेत. त्यानुसार जून २०२५ मध्ये अमेरिकेत होणार्या ३२ संघांच्या क्लब वर्ल्ड कपमध्ये युरोपचे १२ संघ असतील, तर आशिया खंडातील चार संघांना या स्पर्धेत स्थान देण्यात येईल.