औरंगाबाद – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची आज औरंगाबाद येथे सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. मात्र सभेआधीच येथिल राजकीय वातावरण तापले असून त्यांच्या सभेचे लावलेले होर्डिंग फाडण्यात आले आहे. बंजारा ब्रिगेडकडून हायकोर्टासमोरील चौकात लावलेले हे होर्डिंग फाडले असून संत सेवालाल महाराजांच्या नामकरण फलकाच्या समोर होर्डिंग लावल्यामुळे ते फाडले असल्याचे बोलले जात आहे.
भाजप आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून तयारीला लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज औरंगाबादेत नड्डांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच सभास्थळी आणि शहरातील चौकाचौकात यासाठी होर्डिंग लावण्यात आले आहेत. त्यातील एका ठिकाणचे होर्डिंग फाडण्यात आले आहेत. संत सेवालाल महाराजांच्या नामकरण फलकाच्या समोर हे होर्डिंग लावल्यानेच फाडण्यात आल्याचा दावा बंजारा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे.
भाजपकडून सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सभास्थळ आणि परिसरातील रस्त्यांवर आणि चौका-चौकात भाजपचे झेंडे पाहायला मिळत आहे. तर ठिकठिकाणी स्वागताचे होर्डिंग लावण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न देखील केला जात असल्याचे बोलले जात आहे. नड्डा यांच्या सभेला किती गर्दी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
दरम्यान, औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून येथे शिवसेनेची सत्ता आहे. 2019 सोडलं तर लोकसभा देखील सेनेच्याच ताब्यात होती. त्यामुळे आता औरंगाबादमधील शिवसेनेचा गड भेदण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असून, त्याचीच ही सुरवात असल्याची देखील चर्चा आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद लोकसभा निवडणूक देखील यंदा भाजप लढवणार असल्याचे विधान भाजप नेत्यांनी केले आहे. निवडणुकांची तयारी भाजपकडून जोरदार सुरु असल्याचे दिसत आहे. 2024ला देखील पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असे भाजप नेते छातीठोकपणे सांगत आहेत.