Kapil Dev – भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी ऋषभ पंतच्या कार अपघाताबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या अपघातातून पंत सुरक्षित आहे आणि आता त्याच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याने कपिल देव यांनी समाधान व्यक्त केले. ३० डिसेंबरला शुक्रवारी सकाळच्या सुमारास पंतच्या कारला अपघात झाला होता. त्यामुळे त्याला गंभीर दुखापतही झालेली आहे. १९८३ मध्ये भारताला विश्वविजेता बनवणाऱ्या कपिल देव यांनी पंतबद्दल बोलताना युवा खेळाडूंना एक मोलाचा सल्ला दिला आहे.
Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएल 2023 नाही खेळणार? समोर आली महत्वाची माहिती….
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून त्याला खाजगी वॉर्डात हलवण्यात आले आहे. अपघातात पंतच्या कपाळावर दोन कट, उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत, मनगटावर आणि उजव्या हाताला जखमा आहेत. त्यामुळे पंतला या दुखापतीतून सावरण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. पंतला आता पुढील काळात होणाऱ्या महत्वाच्या स्पर्धांना मुकावे लागणार आहे. कपिल देव यांनी युवा खेळाडूंना सल्ला देताना म्हटले आहे की, युवा क्रिकेटपटूंनी एकट्याने कार चालवू नये आणि त्यांनी या कामासाठी चालक ठेवायला हवेत, असे सुचवले आहे.
कपिल देव पुढे म्हणाले की, ‘होय, तुमच्याकडे चांगली गती असलेली आलिशान कार असेल, पण तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण आपल्या गाडीसाठी सहजपणे चालक ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला एकट्याने गाडी चालवायची गरज नाही. मी समजू शकतो की अशा गोष्टींची आवड किंवा छंद असू शकतो. गाडी चालवण्याची आवड असणे हे सामान्य आहे, परंतु आपण देखील त्याबाबतीत जबाबदार असणे आवश्यक आहे. त्यामुळे फक्त तुम्हीच स्वतःची काळजी घेऊ शकता. कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या नाही हे आपणच ठरवू शकतो.
अपघातात पंतला झालेली दुखापती पाहता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळणे त्याच्यासाठी अशक्य असल्याचे मानले जात आहे. याशिवाय पंतला आयपीएल२०२३ मध्येही खेळता येणार की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. भारतीय संघ नवीन वर्षाच्याच सुरुवातीला ३ जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.