पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील सर्व अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, तसेच जाहिरात फलक मालक, जागा मालक, विकासक, जाहिरातदार संस्था यांनी येत्या 31 मार्चपर्यंत त्यास परवानगी घ्यावी, किंवा काढून टाकावेत, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. 31 मार्चनंतर प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्याचा इशारा पीएमआरडीएने दिला आहे.
पीएमआरडीए क्षेत्रात असलेल्या मुख्य चौक, गर्दी वा वर्दळीच्या ठिकाणी, जास्त लांबी, रुंदी व उंचीचे, उंच इमारतीवरील कमाल मर्यादेपेक्षा मोठे तथा राष्ट्रीय महामार्गालगत असलेले अनधिकृत, धोकादायक असलेले आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स येणाऱ्या उन्हाळी वाऱ्यामुळे पडून किंवा कोसळून जीवित वा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुर्घटना घडल्यास कारवाई
अनधिकृत, धोकादायक होर्डिंग, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरित हटविले नाहीत, तर पीएमआरडीएकडून पाडून टाकण्यात येतील, तसेच होर्डिंगमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित जाहिरातदार संस्था यांना व्यक्तिशः जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पीएमआरडीएचे महानगर नियोजनकार सुनील मरळे यांनी दिली.