पिंपरी – पिंपरी येथील दैनिक “पुण्यनगरी’च्या पिंपरी कार्यालयात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी कार्यालयात उपस्थित असणाऱ्या पत्रकाराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता ते गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास घडली.
भूषण चंद्रकांत नांदूरकर (वय 30 रा. काळेवाडी) असे जखमी पत्रकाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास नांदूरकर हे एकटेच कार्यालयात होते. त्यावेळी चोरटा कार्यालयात आला, नांदूरकर यांनी चोरट्याला हटकले. त्यानंतर, चोरट्याने शस्त्र घेऊन नांदूरकर यांचा पाठलाग केला. यावेळी नांदूरकर पडल्याने त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यानंतर, चोरटा आपल्या साथीदारासह दुचाकीवरून पसार झाला. घटनेनंतर नांदूरकर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. नांदूरकर यांची फिर्याद पोलिसांनी घेतली आहे.