तब्बल 15 हजार जणांना कामावरून कमी केल्याने आंदोलनाचा पावित्रा
निधी उपलब्ध नसल्याचे राज्य सरकारकडून लंगडे कारण
पुणे – राज्यातील 15 हजारांहून अधिक होमगार्डसना सध्या कामावरून कमी करण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत शासनाला जागरूक करण्यासाठी राज्यातील होमगार्ड आता आंदोलनाच्या तयारी आहे.
राज्यातील होमगार्डची सध्याची स्थिती आणि त्यांच्या अडचणी याबाबत नुकतीच एक बैठक पुण्यात झाली. याला भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. बाळासाहेब हरपळे, बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामलिंग पुराणे, युवा उद्योजक सचिन हरपळे तसेच होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते.
होमगार्ड हा पोलिसांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असतो. उत्सव काळात बंदोबस्तासाठी पोलिसांबरोबर होमगार्डसुद्धा तैनात असतो. कायदा-सुव्यवस्थेचा कणा असलेला हा होमगार्ड सध्या अडचणीत सापडला आहे. 10 जानेवारीला एक परिपत्रकाद्वारे 15 हजार होमगार्ड यांना कायमस्वरूपी बंदोबस्तावरून स्थगित केले आहे. यावेळी निधी उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावरील होमगार्ड यांना सेवेतून स्थगित केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व होमगार्डंना पुन्हा सेवेत घ्यावे, ही मागणी बैठकीत करण्यात आली.
याशिवाय होमगार्ड यांना कायमस्वरूपी नोकरीत रुजू करून घ्यावे, त्याचबरोबर त्यांना वर्षातील 180 दिवस काम याऐवजी इतर राज्यांप्रमाणे 365 दिवस काम देण्यात यावे. होमगार्डचे मानधन व बंदोबस्तानंतर त्वरित आठवडाभरात द्यावे. होमगार्ड पोलीस भरतीमध्ये 5 टक्क्यांवरून 15 टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागण्यांवर एका महिन्यात निर्णय घ्यावा, अन्यथा फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात मुंबई मंत्रालय येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.