केंद्राच्या इशाऱ्यावर महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न : संजय राऊत

मुंबई – राज्यात जे काही घडत आहे किंवा घडवले जात आहे ते विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारचे आरोप करुन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे हा गेल्या काही दिवसांपासून विरोक्षी पक्षाकडून उपक्रम राबवला जात आहे, असा आरोप शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

राऊत म्हणाले, तुमच्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस, तपास यंत्रणा आहेत. त्या सगळ्या संस्था, महाराष्ट्र पोलीस दल, राज्यातील संस्था निष्पक्षपणे तपास करत असता. पण तुम्ही केंद्र सरकारच्या आदेशावर महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर, प्रमुख नेत्यांवर आरोप करत असाल आणि त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर गृहमंत्रालय कारवाई करु शकते. त्याची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.

साधारणतः अशी घटना होते, त्यावेळी वरिष्ठ अधिकारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना माहिती देतात. पण याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की, नाही. मला माहीत नाही. पण यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. याबाबत जो काही निर्णय घेतला, तो गृहमंत्रालयाने घेतलेला, ही वस्तूस्थिती आहे. या कारवाईबाबत शरद पवारांच्या हस्तक्षेपाचा अजिबात प्रश्न उद्‌भवत नाही. रविवारी जी परिस्थिती कोल्हापुरात जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आली. ती त्यांनी गृहविभागाला कळवली. त्यानंतर दोन्ही पक्ष समोरा-समोर आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून ही कारवाई करण्यात आली.
– दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री

 

देशाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले असेल की, एक व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करायला जातो आणि पोलीस त्याला अडवतात. यासाठी कारण सांगितले जाते की, तिथे ज्यांच्याविरोधात तक्रार करायची आहे, त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील, म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. स्वतंत्र भारतात, अशाप्रकारची कायदा-सुव्यवस्था यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नसेल. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. त्यामुळे एकूणच जे काही चालले आहे, ते भयानक आहे.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.