नांदेड – महावितरणच्या नांदेड परिमंडळांतर्गत वीजचोरांविरोधात राबविलेल्या मोहिमेत गेल्या चार महिन्यात तब्ब्ल 975 वीजचोरांना महावितरणने दणका दिला आहे. यापैकी 371 वीजचोरांकडून 81 लाख 58 हजार रूपयांची वसुली करण्यात आली आहे. तर बील न भरणाऱ्या वीजचोरांवर विद्युत कायदा 2003 अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांच्या निर्देशानुसार वीज चोरीला आळा घालून कंपनीचे होणारे अर्थीक नुकसान टाळण्याच्या हेतुने नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर यांनी जून 2021 पासुन वीजचोरां विरोधात आक्रमकपणे मोहिम उघडली. गेल्या चार महिण्याच्या कालावधीत नांदेड परिमंडळांतर्गत येणाऱ्या परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयातील 975 वीजचोरांचा पर्दाफाश करण्यात यश मिळविले आहे.
या धडाकेबाज कारवाईत आकडे टाकून वीज वापरणाऱ्यांसोबतच, मीटर मध्ये छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर वीजबील थकबाकी असल्यामुळे तात्पुरता अथवा कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांचीही तपासणी या मोहीमेत करण्यात आली. या कारवाईत तब्बल 13 लाख 11 हजार 517 युनिट वीजेची चोरी झाल्याचे आढळून आले आहे.
या मोहिमेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पथके तयार करुन दिवस-रात्र आक्रमकपणे वीज चोरी शोधण्यात आली. या कारवाईत नांदेड जिल्हयातील 59 वीज चोरावर कलम 126 नुसार तर 451 वीज चोरावर कलम 135 नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये भोकर विभागातील 8 वीज चोरावर 126 नुसार तर 154 वीज चोरावर कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली.
देगलूर विभागातील 8 वीज चोरावर 126 नुसार तर 46 वीज चोरावर कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली. नांदेड ग्रामिण विभागातील 5 वीज चोरावर 126 नुसार तर 53 वीज चोरावर कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच नांदेड शहर विभागातील 11 वीजचोरावर 126 नुसार तर 198 वीजचोरावर कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तर 159 वीज चोरांकडुन 42 लाख 20 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
परभणी जिल्हयातील 14 वीज चोरावर कलम 126 नुसार तर 167 वीज चोरावर कलम 135 नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये परभणी विभाग क्रमांक एक मधील 9 वीज चोरावर 126 नुसार तर 109 वीज चोरावर कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली. परभणी विभाग क्रमांक दोन मधील 5 वीज चोरावर 126 नुसार तर 58 वीज चोरावर कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली. तर 64 वीज चोरांकडुन 16 लाख 16 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्याच बरोबर हिंगोली जिल्हयातील 21 वीज चोरावर कलम 126 नुसार तर 263 वीज चोरावर कलम 135 नुसार कारवाई करण्यात आली. तर 148 वीज चोरांकडुन 23 लाख 22 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
“वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणचे कर्मचारी दिवसा व रात्री केंव्हाही धाड टाकून वीज चोरा विरोधात कारवाई करत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच वीजेचा वापर करावा. वीज खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांना शेजाऱ्यांनी वीज पुरवठा दिल्यास त्यांच्यावरही वीज कायदयान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरांविरोधात प्रसंगी फौजदारी गुन्हे ही दाखल करण्यात येतील.” दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंता