मुंबई – लोकसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पक्षाध्यक्ष पदाची हंगामी जबाबदारी सोनिया गांधी यांनी स्वीकारली होती. अद्यापही पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसून सोनिया गांधी याच हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहत आहेत.
अशातच काँग्रेसच्या काही जेष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे मनातील खदखद व्यक्त केली होती. यानंतर बराच वादंग झाला मात्र काँग्रेसला अद्यापही पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला नाही. आता काँग्रेस अध्यक्षपदाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला सूचना केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रिपाई (आठवले गट) अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला अध्यक्ष निवडीबाबत सल्ला दिला आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करताना, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विसर्जित करून जेष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेस अध्यक्षपद बहाल करावे असा सल्ला दिला आहे.
याबाबतच्या ट्विटसोबतच आठवले यांनी त्यांची सूचना शरद पवार व राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहचावी यासाठी दोन्ही नेत्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यांना टॅग देखील केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये ते लिहतात, “काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेस चे अध्यक्ष करावे.याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा.”
काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेस चे अध्यक्ष करावे.याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनीघ्यावा.@PawarSpeaks@RahulGandhi
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 5, 2020
आठवले यांच्या या सूचनेवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.