मुंबई – सुशांत मृत्यू प्रकरणाला अंमली पदार्थ पुरवठ्याचीही किनार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात अंमलीपदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ पुरवठा साखळीतील ‘मोठा मासा’ शोधण्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे.
सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरु असताना अंमली पदार्थ रॅकेटबाबत माहिती मिळाली होती. याबाबत स्वतंत्र चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने हे प्रकरण नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडे सोपवले. यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने रियाचा भाऊ शोविक व सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना अटक केली आहे.
अंमली पदार्थ पुरवठा रॅकेटमध्ये आंतरराष्टीय वा आंतरराज्यीय कनेक्शन आहेत का? याचा शोध घेणार असल्याचं नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
“अटक करण्यात आलेल्या शोविक व मिरांडा यांची रिमांड कस्टडी भेटली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्वांना एकमेकांसमोर आणून त्यांच्याकडून अंमली पदार्थ पुरवठ्यातील त्यांच्या भूमिकेबाबत माहिती घेतली जाईल. चौकशी दरम्यान नवीन नाव उघडकीस आल्यास त्यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात येईल” असं नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
तत्पूर्वी, आज मुंबई येथील एका न्यायालयाने रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक व सुशांतच्या हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांना ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या कस्टडीत (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो) ठेवण्याचे आदेश दिले.
शोविक व मिरांडा यांच्यापूर्वी झैद विलत्रा (२१) व अब्देल बासित परिहार (२३) यांना अटक केली होती. त्यांनाही एनसीबीच्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आले आहे.