सासवड/दिवे – छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा शासकीय करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात होणारा पुतळ्याचे काम लवकरच सुरू करणार आहोत. पुरंदर पंचायत समिती, पुरंदर प्रतिष्ठान संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने यापुढे शासकीय जयंती साजरी करण्यात येईल आणि किल्ल्याच्या पायथ्याशी शंभूसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
किल्ले पुरंदर (ता. पुरंदर) येथे रविवारी (दि. 14) आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शासकीय सोहळ्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. सकाळी पाळणा, यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची ढोल पथकासहमिरवणूक, कार्यक्रमस्थळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्याचे आयोजक पुरंदर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटणे यांनी केले होते.
यावेळी आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी अधिकारी मिनाज मुल्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, गटविकास अधिकारी अमर माने, पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे, जालिंदर कामठे, प्रशांत वांढेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान, किल्ल्यावर दांडपट्टा, तलवारबाजी असे विविध खेळ झाले.