पुणे – शाळेचे नियम मोडणे, व्रात्यपणा करणे यामध्ये मी पुढे असायचो. तरीही माझ्यातील कलागुण ओळखून शिक्षकांनी मला नाटकात काम करण्याचा सल्ला दिला; तेथूनच आयुष्याला कलाटणी मिळाली. माझ्या अभिनायाच्या यशात नू.म.वि.प्रशालेचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
प्रशालेच्या “आम्ही नूमविय’ माजी विद्यार्थी संघटनेतर्फे देण्यात येणारा यंदाचा नू.म.वि. जीवनगौरव पुरस्कार डॉ. मोहन आगाशे आणि ज्येष्ठ अर्थ सल्लागार आणि कॉसमॉस बॅंकेचे उपाध्यक्ष मुकुंदराव अभ्यंकर यांना प्रदान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, प्रमुख पाहुणे डॉ. अजित रानडे, ‘आम्ही नूमविय’चे अध्यक्ष अजित रावेतकर, कार्याध्यक्ष किशोर लोहोकरे, उपाध्यक्ष मोहन उचगावकर, सचिव मिलिंद शालगर, अभिषेक पापळ, मुख्याध्यापिका प्राची गुमास्ते, शाळा समिती अध्यक्ष पराग ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुकुंदराव अभ्यंकर यांच्या वतीने मिलिंद काळे यांनी पुरस्कार स्वीकारला. तर शरद काळे यांना मरणोत्तर जाहीर झालेला जीवनगौरव पुरस्कार पत्नी सुनीती यांनी स्वीकारला.रावेतकर यांनी प्रास्ताविक आणि राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. लोहोकरे यांनी आभार मानले.
शाळेला आईची उपमा दिली जाते. आईकडून मिळालेला हा पुरस्कार असला तरी त्यात कृतज्ञतेचाच भाव अधिक आहे. हजारो वर्षांचा अंधःकार मेणबत्तीने क्षणार्धात घालवता येतो, तसेच नू.म.वि.चे विद्यार्थी समाजातील अंधःकार घालवून प्रबोधन करतील.
डॉ. अजित रानडे, गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठ