सध्या सावरकरांचा नाही तर, विकासाचा मुद्दा महत्त्वाचा : दलवाई

पुणे – सावरकरांची काही विधाने योग्य आहेत, असेही नाही. मात्र, सध्या सावरकरांचा मुद्दा महत्त्वाचा नाही. तर विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, अशा शब्दात कॉंग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी अप्रत्यक्षपणे कॉंग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला.

पुण्यात एका कार्यक्रमासाठी दलवाई आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या “रेप इन इंडिया’ वक्‍तव्यावरून त्यांनी परखडपणे आपली भूमिका मांडली. यासंदर्भात बोलताना हुसेन दलवाई म्हणाले, सध्या शेतीचा प्रश्‍न आहे. तरुणांना नोकरी नाही. अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत सावरकरांचा मुद्द्यापेक्षा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार सर्व घटकांना सामावून विकासाची स्वप्ने दाखविणे आणि ते प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने प्रयत्न करणार आहे.

सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल
सरकार पडावे म्हणून कोणी पाण्यात देव ठेवून बसले असतील तर त्यांची निराशा होईल, पण हे सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात कितीही मतभेद असले तरी ते एकमेकांशी जुळवून घेतील. भाजप आणि शिवसेनेइतके आमचे संबंध टोकाचे नाहीत. कॉंग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा वेगवेगळी असल्याने मतभेद हे होणारच. आमच्या सरकारचे नावच महाराष्ट्र विकास आघाडी आहे, आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीच आमचे सरकार झाले आहे, असेही दलवाई यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.