पुणे -पावसाळ्यात खराब झालेले रस्ते नव्याने करण्यास महापालिकेककडून सुमारे 150 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत सोमवारी रात्री टिळक रस्त्यावर डांबरीकरणाचे काम होताच पहाटेच्या सुमारास लगेचच रस्ता खोदण्यासाठी समान पाणी योजनेचे जेसीबी आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा प्रकार माहीत होताच पथ विभागाने तातडीने कर्मचाऱ्यांना पाठवित कोणतीही खोदाई करू नये, असे आदेश दिले आहेत. मात्र, या प्रकारामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा आणि पथ विभागात समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने संबधित कामाच्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिकेच्या निषेधाचे फलक लावले आहे. ही बाब समोर येताच अर्बन सेलचे प्रमुख नितीन कदम, अभिजित बारवकर, दिनेश खराडे यांनी महापालिकेच्या पथ विभागाकडे याबाबत तक्रार करून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
रात्री केले डांबरीकरण रात्रीतच खोदाई
महापालिकेकडून टिळक रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात, सोमवारी रात्री टिळक रस्त्यावर हिराबाग चौकात महापालिकेने डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने पाणी पुरवठा तसेच ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच, रस्ता झाल्यास खोदाई करता येणार नाही असे सांगण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम नसल्याचे सांगितले. त्यामुळे पथ विभागाने ठेकेदारास काम करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, ठेकेदारानेही रस्त्याचे काम केले. मात्र, काम झाल्यानंतर पहाटे लगेचच पाणी पुरवठा विभागाने जलवाहिनीचे काम दिलेल्या कंपनीने जेसीबी आणून डांबरीकरण झालेला रस्ता खोदण्यास सुरूवात करण्यात आली ही. बाब तातडीने पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी लगेच संबंधित काम थांबविण्याचे आदेश दिले. मात्र, तो पर्यंत नव्याने केलेल्या रस्त्याचा काही भाग खोदण्यात आला होता.
अधिकाऱ्यांचा सत्कार
पुणे शहरातील अत्यंत महत्त्वाचा असलेला टिळक रस्ता-हिराबाग चौक येथे एक दिवसापूर्वीच करण्यात आलेले असताना या ठिकाणी दुसऱ्याच दिवशी समान पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी रस्ता खोदकाम सुरू करण्यात आले होते. अशा, अनियोजीत कामामुळे तसेच पालिकेच्या विभांच्या सम्नवयाच्या अभावातून पुणेकरांचा कोट्यावधींचा निधीचा अशा खोदकामात चुराडा होत असल्याची बाब पथविभागाचे प्रमुख व्ही.जी कुलकर्णी यांच्या निदर्शनास आणून देत राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहराध्यक्ष नितीन कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करीत निषेध केला.
टिळक रस्त्यावर खोदाई करण्यात येत असल्याची माहिती मिळताच संबंधित काम थांबविण्यात आले आहे. काम सुरू करण्यापूर्वी सर्व विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही हा प्रकार घडलेला असल्याने संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. – व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख
टिळक रस्ता : हिराबाग चौक येथे नवीनच केलेला डांबरीरस्ता दुसऱ्याच दिवशी खोदण्यात आला. महापालिका रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी कोट्यवधींचे टेंडर करते. परंतु, सर्व विभागांचे नियोजन व समन्वय करून शहरात कामे केल्यास डांबरीकरण आणि त्यांनतर खोदाईच्या कामात वाया जाणाऱ्या कोट्यवधी रूपयांची बचत होईल. यातून अन्य विकासकामांना गती देता येईल. सदर बाब आम्ही अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देत त्यांचा गुलाब व नारळ देऊन सत्कार केला. – नितीन कदम, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी अर्बन सेल