कराड – बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीमाना दिल्याबाबत मला काही माहिती नाही. मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घडलेल्या घडामोडींमुळे कॉंग्रेसची एक जागा कमी झाली आहे. ही बाब गंभीर असून, याबाबत पक्षश्रेष्ठींकडून चौकशी सुरु आहे. भाजपचा प्रत्येक वेळी कॉंग्रेसची माणसे फोडण्याचा प्रयत्न असतो. भाजपला स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आले नाही, असा टोला माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.
कराडमधील उड्डाणपुलासंदर्भात आ. चव्हाण यांनी संबधित विभागाची आढावा बैठक येथील विश्रामगृहात मंगळवारी घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस असल्याने, आज मी त्यांना सोशल मीडियातून शुभेच्छा दिल्या. त्यांच्याशी माझे बोलणे झालले नाही. 15 फेब्रुवारीला कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीस प्रभारी एच. के. पाटील उपस्थित राहणार असून, त्यावेळी या प्रश्नावर सविस्तर चर्चा होईल.
दरम्यान, पुणे-बंगळुरू महामार्गावरील कोल्हापूर नाका व मलकापूर येथील दोन्ही उड्डाणपूल पाडण्यासंदर्भात त्यांनी प्रकल्पाचे प्रमुख अभियंता सतेंद्राकुमार वर्मा व अन्य अधिकाऱ्यांकडून या कामाचा आढावा घेतला. ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, प्रातांधिकारी उत्तम दिघे, कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, कराड वाहतूक शाखेच्या सरोजिनी पाटील, ऋतुराज मोरे, मलकापूरच्या नगराध्यक्ष नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे उपस्थित होते. कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलावरून सुरू असलेली वाहतूक मंगळवारी मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद करून, उद्या, दि. 8 रोजी सकाळी उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. त्याबाबत पूर्वतयारी करण्यात आल्याचे वर्मा यांनी सांगितले.