अबुजा (नायजेरिया) :- नायजेरियाच्या उत्तरेला एक प्रवासी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान 103 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. एका विवाह समारंभावरून परत येत असलेले लोक या बोटीमध्ये होते. मृतांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी काल सांगितले.
ही दुर्घटना सोमवारी सकाळी नायजेरियातील क्वारा प्रांतातल्या पतेगी जिल्ह्यात निगर नदीत घडली. प्रांताची राजधानी असलेल्या लिओरीन शहरापासून हे ठिकाण 160 किलोमीटर अंतरावर आहे. या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते, असे पोलिसांनी सांगितले. बोटीतील 100 पेक्षा जास्त प्रवाशांना वाचवण्यात यश आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एका विवाह समारंभासाठी जवळपासच्या गावातील लोक एकत्रितपणे गेले होते. रात्रभराच्या समारंभानंतर हे सर्वजण परत येत असताना ही दुर्घटना घडली. जाताना हे सर्वजण वाहनांनी गेले होते. मात्र मुसळधार पावसामुळे रस्ता पाण्याखाली गेल्याने बोटीने परत येत होते. बोटीत किमान 300 लोक होते, असे ग्रामस्थांनी सांगितले.
ही बोट रात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे मदतीला त्वरित कोणी येऊ शकले नाही. बोट बुडाल्याचे समजताच जवळच्या गावकऱ्यांनी किमान 50 जणांना वाचवले. मंगळवारी दिवसभर नदीच्या पात्रामध्ये शोध आणि बचावाचे काम सुरू होते.