अबुजा, (नायजेरिया)- नायजेरियातील एका चर्चच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. गरजवंतांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान ही चेंगराचेंगरी झाली. मृतांमध्ये एका गर्भवतीचा आणि काही लहान मुलांचाही समावेश आहे, असे एका प्रत्यक्ष साक्षीदाराने सांगितले.
हा कार्यक्रम किंग्ज असेंब्ली पेंटॅकोस्टल या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केला होता. चर्चच्या मोफत मदतकार्यासाठी दरवर्षी येणारे लोक या कार्यक्रमासाठी जमा झाले होते. असे कार्यक्रम नायजेरियामध्ये नियमितपणे होत असतात. नायजेरियातील 80 जनता दारिद्य्रात आहे.
आजचा कार्यक्रम सकाळी 9 वाजता सुरू होणार होता. मात्र रांगेत जागा मिळवण्यासाठी शेकडो जण पहाटे 5 वाजल्यापासून हजर झाले होते. चर्चच्या प्रवेशद्वाराचे कुलुप तोडले गेले आणि ही गर्दी आत घुसली. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली, असे पोलिसांच्या प्रवक्त्या महिलेने सांगितले. नायजेरियाच्या नॅशनल इमर्जन्सी एजन्सीने गर्दी पांगवली.
मृतांना आणि जखमींना रुग्णालयात पोचवले आणि घटनास्थळी सुरक्षा रक्षकांनी नाकाबंदी केली. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश आहे. एकाच महिलेच्या 5 मुलांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला, असे एका साक्षीदाराने सांगितले. या चेंगराचेंगरीनंतर मृतांच्या नातेवाईकांनी चर्चच्या कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला, असेही काही साक्षीदारांनी सांगितले.
या घटनेनंतर मोफत मदतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि घटनेच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश नायजेरियाच्या सरकारने दिले आहेत. 2013 साली अशाच घटनेमध्ये 23 जणांचा मृत्यू झाला होता.