मुंबई – शिंदे सेनेच्या नव्या जाहिरातीमुळे विरोधकांसह आता भाजपकडूनदेखील नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रचंड खर्चाच्या जाहिराती देणारा शिवसेनेचे हितचिंतक कोण आहे? यावर भाजपच्या मंत्र्यांचा फोटा का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.
पवार म्हणाले की, शिवसेनेला असा कोण हितचिंतक मिळाला त्याचे नाव तरी त्यांनी सांगावे. ज्यांच्या पाठिंब्यावर हे स्वत: मुख्यमंत्री आणि काही मंत्री झाले, त्याच पक्षाला हा खोडसाळपणा वाटतोय, असा टोला पवारांनी लगावला आहे. या प्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासह खासदार अनिल बोंडे यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. याच नव्या जाहिरीतीवरून आता पवार यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना संतप्त सवाल केला आहे.
पवार बोलताना पुढे म्हणाले, नवी जाहिरात म्हणजे आधीच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये तुम्ही भाजप आणि शिवसेनेचा जाहिरातीत उल्लेख केला आहे तर मग फक्त शिवसेनेच्या 9 मंत्र्यांची खाली माळ लावली आहे. मग त्यात भाजपच्या मंत्र्यांचे फोटो का टाकले नाहीत? अशी विचारणाही त्यांनी केली.
बुधवारी छापून आलेल्या जाहिरातीत शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे, दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटातील 9 मंत्र्यांचे फोटो छापले आहेत.