Asian Games 2023 Day Five : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून चार दिवसांत भारताने 22 पदके जिंकली आहेत. पाचव्या दिवशीही अनेक खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे.
चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज (दि.28) 5वा दिवस आहे.भारतानं पाचव्या दिवशी आज वुशूमध्ये रजत पदक तर 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतीय पुरूष संघाने सुवर्णपदक आणि काही वेळापूर्वी घोडेस्वारीत आणखी एक पदक मिळवले असून भारताची आतापर्यंत एकूण पदकांंची संख्या 25 झाली आहे.
घोडेस्वारीत भारताने आणखी एक पदक जिंकले आहे.भारताच्या अनुश अग्रवाला यानं (Anush Agarwalla) घोडेस्वारीच्या ड्रेसेज प्रकारामध्ये तिसरे स्थान मिळवले आणि 73.030 गुणांसह वैयक्तिक कांस्यपदक जिंकले! घोडेस्वारीत भारताचे सांघिक सुवर्णपदकानंतर अनुशचे हे दुसरे पदक आहे.
दरम्यान, 2018 च्या आशियाई खेळांमध्ये, भारतीय संघाने 570 सदस्यांच्या तुकडीतून 80 पदके मिळवून आशियाई खेळांमध्ये सर्वाधिक पदकांचा विक्रम प्रस्थापित केला होता. आता या चालू आवृत्तीत (Asian Games 2023) , भारतीय संघाला 100 हून अधिक पदकांचे लक्ष्य ठेवून मागील सर्वोत्तम कामगिरीचा टप्पा ओलांडण्याची आशा आहे.