पाल्लेकेले :- भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याने आशिया करंडक स्पर्धेतील कामगिरीद्वारे एका अनोख्या कामगिरीची नोंद केली आहे.
गिलने या स्पर्धेत नेपाळविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत 62 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने एकदिवसीय सामन्यांत 1500 धावांचा टप्पा गाठला. यासह त्याने नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
गिल याने केवळ 29 एकदिवसीय सामने खेळताना 1500 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यात एक द्विशतक, तीन शतके तसेच सात अर्धशतकांचा समावेश आहे. गिल याने दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमलाच्या कामगिरीला मागे टाकले. आमलाने 30 डावात 1500 धावा केल्या होत्या.तसेच पाकचा कर्णधार बाबर आझम याने 1500 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 32 सामने खेळले आहेत.
यापूर्वी भारताकडून सर्वात जलद 1500 धावा करण्याची कामगिरी श्रेयस अय्यरच्या नावावर होती. श्रेयसने 34 सामन्यात ही कामगिरी केली होती. या स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका यांनी प्रवेश केला आहे. या गटातील पहिले दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.