#AsiaCup2023 #INDvSL #Final : अखेर आशिया चषक 2023 ची सांगता झाली. 19 दिवस चाललेल्या या स्पर्धेत 13 सामने खेळले गेले. भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव अवघ्या 50 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 6.1 षटकात 10 विकेट्स राखून हा सामना जिंकत आठव्यांदा आशिया कपवर आपले नाव कोरलं आहे.
या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहंमद सिराज भारताकडून सर्वात जलद पाच गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने अवघ्या 16 चेंडूंत 5 गडी बाद केले. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम लढतीत त्याने एकूण 7 षटके गोलंदाजी करताना 21 धावांत 6 गडी बाद केले.
चौथे षटक ठरले वादळी
सिराजने श्रीलंकेच्या डावातील चौथे षटक टाकताना पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या व सहाव्या चेंडूवर बळी घेतले.
– पहिला चेंडू पाथुम निसांका
– तिसरा चेंडू सादिरा समरविक्रमा
– चौथा चेंडू चरिथा असालंका
– सहावा चेंडू धनंजय डिसील्व्हा
चौकार अडवण्यासाठीही धावला…
सिराजने टाकलेल्या श्रीलंकेच्या डावातील चौथ्या षटकात धनंजय डिसील्व्हाने पाचव्या चेंडूवर चौकार फटकावला. हा चेंडू अडवण्यासाठी सिराजच सीमारेषेपर्यंत धावला. चौकार जरी डिसील्व्हाने फटकावला असला तरीही चर्चा मात्र सिराजच्या धावण्याचीच झाली. यावेळी सिराजसह सर्व संघ सहकारी खेळाडू तसेच प्रेक्षकांनाही हसू आवरले नाही.