कोलंबो :- आशिया करंडक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात पराभूत झाल्यावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सहकारी खेळाडूंवर संताप व्यक्त केला आहे. इतक्या महत्त्वपूर्ण सामन्यात खेळाडूंनी जबाबदारी ओळखून खेळ करणे गरजेचे होते, असे ताशेरेही बाबर आझमने ओढले आहेत.
आशिया स्पर्धेत संभाव्य विजेता मानल्या जात असलेल्या पाकिस्तानला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आले. त्यानंतर बाबरने आपला संताप व्यक्त केला आहे.
आम्ही नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाचा अंदाज असल्याने असा निर्णय घेतला, कारण वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. मात्र, आमची फलंदाजी फारशी यशस्वी ठरली नाही. मोठी धावसंख्याही उभारता आली नाही. तसेच गोलंदाजीतही सुरुवातीलाच यश मिळाले असते तर श्रीलंकेच्या फलंदाजांवर दडपण आले असते. मात्र, तसे घडले नाही. आम्ही सोपे झेलही सोडले, क्षेत्ररक्षणातही अनेक चुका केल्या, असेही बाबरने म्हटले आहे.
श्रीलंका संघाच्या फलंदाजांनी सरस कामगिरी केली. त्यांचे बळी जात असतानाही त्यांनी परिस्थितीचा जिद्दीने सामना केला. त्यांचे प्रमुख फलंदाज एका बाजूने बाद होत असताना त्यांच्या तळातील फलंदाजांनी दाखवलेली जिद्द खरोखरच कौतुकास्पद आहे. डावातील मधल्या षटकात आमची फलंदाजी अपयशी ठरली व त्यामुळेच आमचा पराभव झाला. श्रीलंकेच्या फलंदाजांवर जेवढे दडपण राखणे गरजेचे होते, ते आम्हाला जमलेच नाही, असेही बाबरने सांगितले.