बुचकेंची मावळ पट्टयात प्रचारात आघाडी

ओतूर -जुन्नर विधानसभेच्या अपक्ष उमेदवार व जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांना तालुक्‍यातून महिला व तरुणांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. त्यांची भावनिक लाट तालुक्‍यात काम करणार का? हे आता निकालाच्या दिवशीच समजणार आहे.

बुचके यांचा प्रचार सध्या तालुक्‍याच्या मावळ भागात तसेच वाड्या-वस्त्यांवर रंगत आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या निधीतून त्यांनी अनेक कामे केलेली आहेत. तसेच विजय मिळाला तर माजी आमदार लतानानी तांबे यांच्यानंतर त्या पहिल्या महिला आमदार असतील, अशी भावना जनसामान्यातून बोलली जात असल्याचे बुचके समर्थकांनी सांगितले.

शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फळी त्यांच्यासोबत आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला शह देण्यासाठी त्यांची पूर्ण तयारी प्रचार यंत्रणेतून दिसत आहे. त्यांचा प्रचार दौरा सध्या ग्रामीण, मावळ, वाड्या-वस्त्यांवर असला तरी तालुक्‍यातील मोठ्या गावांमध्ये त्यांचा थेट मतदारांशी संपर्क झालेला नाही. या गावांमधून प्रचार दौरे काढण्यासाठी बुचकेंना बोलवले जात आहे. त्यांची कन्या ज्योती दुराफे या देखील प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन मतदारांशी संपर्क साधत आहेत. अपक्ष असले तरी मी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांपेक्षा मताधिक्‍य घेईल, असा विश्‍वास त्या प्रचार दौऱ्यात व्यक्त करीत आहेत.

ओतूर-पिंपरी-पेंढार गटातून त्यांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. मतदार राजा मलाच कौल देईल, असे सर्वांनाच वाटत असले तरी अखेर जनता जनार्दन कोणाच्या पारड्यात मतांचा जोगवा टाकेल हे निकालाअंती कळणारच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.