नरेंद्र मोदींच्या सभेची साताऱ्यात उत्सुकता  

सातारा  – जिल्ह्यात विधानसभा व लोकसभेच्या प्रचाराचे रण प्रचंड तापले आहे. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 17 ऑक्‍टोबरला होणारी सभा राजकीय दृष्ट्या महत्वाची असून जिल्हा कार्यकारिणीने सभेच्या जय्यत तयारीचा भाग म्हणून सैनिक स्कूलच्या मैदानावर तळ दिला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यात उपस्थित राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मोदींची सभा राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रथमच होत असून या सभेने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्यात महायुतीने आठही विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार देऊन पवारांचे वर्चस्व मोडीत काढण्याचा आटापिटा चालवला आहे.

ईडीचा राजकीय बूमरॅंग आणि त्याचे महाराष्ट्रातील पडसाद राष्ट्रवादीच्या बाजूला फिरल्याने भाजप प्रचारातून बाजूला जाऊन व्यक्तिगत टीकेवर उतरला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कराड येथे झालेल्या सभेत शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे सातारा जिल्ह्यात महायुती विरूद्ध आघाडी अशी राजकीय रणधुमाळी इरेला पेटली आहे. त्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातारा जिल्ह्याच्या मुख्यालयात सातारा शहरात प्रथमच सभा होत असून मोदी यांना ऐकण्यासाठी सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर सुमारे दोन लाख श्रोते उपस्थित असतील असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

शरद पवारांची साताऱ्यातील राजकीय ताकत राष्ट्रवादीचे राजकीय बलाबल यांचा पूर्ण अंदाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. मागील लोकसभेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पंढरपूर येथे झाली होती. त्यावेळी मोदी यांनी पवारांचा उल्लेख शरदरावजी असा केला होता. आता येत्या गुरूवारी नरेंद्र मोदी यांची तोफ साताऱ्यात पहिल्यांदाच धडाडणार असून कलम 370 ते शरद पवार असाच मोदींच्या भाषणाचा प्रवास असणार काय? याचीच खरी उत्सुकता आहे.

पोलीस यंत्रणा “हाय अलर्ट’वर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अवघ्या 48 तासांवर येऊन ठेपल्याने राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेसह जिल्ह्याची पोलीस यंत्रणासुध्दा प्रचंड हाय अलर्टवर झाली आहे. आठही विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार, उदयनराजे भोसले यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मोदी यांच्या भव्य स्वागतासाठी साताऱ्यात उपस्थित राहणार आहेत. उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, अतुल भोसले, शेखर चरेगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर तळ दिला आहे. कार्यक्रमाच्या बारीक सारिक तयारीचा काटेकोरपणे आढावा घेतला जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)