नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण तापले आहे. मुस्लिम धर्मगुरूंसोबतच अनेक नेत्यांनीही नुपूर यांच्या अटकेची मागणी केली आहे. ओवेसींनी नुपूर यांच्या वक्तव्याला विरोध केला आहे. भारत सरकारकडून त्वरीत कारवाई करून नुपूरला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एका मीडिया टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारवरही सडकून टीका केली. ते म्हणाले की, जर आखाती देशांनी काही हालचाली केल्या नसत्या तर मोदी सरकारने अजूनही नुपूरवर कसलीही कारवाई केली नसती. भाजप सरकारने नुपूर यांच्यावर एवढ्या उशिरा कारवाई का केली असा सवालही त्यांनी केला.
ओवेसी म्हणाले की, आखाती देशांनी हे प्रकरण खुप गांभीर्याने घेतले, त्यामुळे मजबुरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय प्रवक्त्यावर कारवाई केली. केवळ अरब देशांच्या इशाऱ्यावर कारवाई का, असे ओवेसी म्हणाले. ही कारवाई 10 दिवसांपूर्वी व्हायला हवी होती. तुम्हाला परदेशातील नेत्यांना खूश करायचे आहे, त्यामुळे कारवाई केली, असे ते म्हणाले. त्यांची निराशा तुम्हाला समजते, आमची का समजत नाही, असेही ओवेसी म्हणाले.
ओवेसींनी मोदी सरकारशिवाय विरोधी पक्षांवरही हल्लाबोल केला. विरोधी पक्ष गप्प असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला. या प्रकरणात तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांच्या तोंडात दही गोठल्याचे ते म्हणाले. फक्त आम्हीच बोलत होतो. तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष काल रात्री अचानक कृतीत उतरल्याचे त्यांनी सांगितले.
कोण आहे नुपूर शर्मा?
नुपूर या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. 2015 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने त्यांना उभे केले तेव्हा त्या पहिल्यांदा प्रकाशझोतात आल्या होत्या. नुपूर भाजप दिल्लीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्याही होत्या. त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाही होत्या. 2008 मध्ये AVBP कडून विद्यार्थी संघटनेची निवडणूक जिंकणारी नुपूर एकमेव उमेदवार होती. 2010 मध्ये विद्यार्थी राजकारण सोडल्यानंतर नुपूर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चामध्ये सक्रिय झाल्या आणि मोर्चात राष्ट्रीय मीडिया प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेल्या नुपूर या पेशाने वकीलही आहेत. याशिवाय त्यांनी बर्लिनमधूनही शिक्षण घेतले आहे.