बीड – मागील काही दिवसांपासून राज्यभरात महिलांवरील हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यातच आज बीड येथे नायब तहसीलदार महिलेवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने बीड जिल्हा हादरला असून एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातील आरोपी तहसीलदार महिलेचा सख्खा भाऊ असल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुासर केज तहसीलमध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तहसीलदार आशा वाघ नेहमीप्रमाणे अस्थापना विभागात सेवा बजावत होत्या. त्यावेळी अचानक त्यांचा सख्खा भाऊ कार्यालयात येऊन गोंधळ घालू लागला. त्यानंतर त्याने कोयत्याने आशा यांच्यावर हल्ला केला. यात आशा जखमी झाल्या.
कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान साधून हल्लेखोर भावाला एका खोलीत डांबून ठेवलं. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. तर तहसीलदार आशा वाघ यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं.
या घटनेनंतर केज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल आहे.