कर्जत -तालुक्यातील कुळधरण जिल्हा परिषद गटातील सरपंच, ग्रामसेवक तसेच पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची पंचायत समितीत आढावा बैठक घेण्यात आली. सभापती अश्विनी कानगुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी गटविकास अधिकारी अमोल जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी परमेश्वर सुद्रिक आदी उपस्थित होते.
या बैठकीत कानगुडे यांनी 14 वा वित्त आयोग निधी, दलित वस्ती सुधार योजना, वृक्ष लागवड, मनरेगा योजनेचा आढावा घेतला. गटामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नसल्याचे निदर्शनास आल्याने सभापतींनी ग्रामसेवकांना जाब विचारला. रोजगार हमी योजनेतील परिपूर्ण प्रस्ताव सादर केले जात नाहीत, ज्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचे नाव आराखड्यात समाविष्ट केले जात नसल्याबाबत त्यांनी खडे बोल सुनावले. आराखडा सर्वसमावेशक असला पाहिजे, गाव पातळीवर त्याची प्रसिद्धी होऊन सक्षम आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
विहीर पुनर्भरण, शोष खड्डे, वृक्ष लागवड अशा वैयक्तिक तसेच सार्वजनिक कामाचा समावेश करावा. 14 वा वित्त आयोग, दलित वस्तीमधील कामे दर्जेदार व विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शौचालय बांधकामे करून त्याच्या अनुदानाचा लाभ कुटुंबास देण्यात यावा, ग्रामपंचायतकडून वृक्षारोपणाचे काम हाती घ्यावे तसेच गावात स्वच्छता अभियान राबविण्याचे त्यांनी ग्रामसेवकांना सूचित केले.