वडगावशेरीत लवकरच “भामा आसखेड’चे पाणी

आमदार टिंगरे यांची माहिती; प्रकल्पाची केली पाहणी
येरवडा (प्रतिनिधी) –
भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होणार असून पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल. यातून वडगावशेरीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार असल्याचे आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितले.
भामा आसखेड प्रकल्पातील जलशुध्दीकरण केंद्र, ब्रेकींग प्रेशर टॅंक व भामा आसखेड धरणाच्या जॅकवेल पंप हाऊसची पाहणी आमदार टिंगरे यांनी केली. यावेळी पालिकेचे अधिक्षक प्रविण गेडाम, कार्यकारी अभियंता कड व भामा आसखेड प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत केळगाव येथील 1.1 कि.मी. पाइपलाइनचे काम बंद असल्याचे तसेच भामा आसखेड धरणाच्या कालव्यासाठी आरक्षित केलेल्या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील शेरे काढण्याची बाब आमदार टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणुन दिली होती. यानुसार याबाबतचे आदेश खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. याची तातडीने अंमलबजावणी करीत केळगावमधील 1.1 कि.मी.चे रखडलेले काम वेगाने चालू करण्यात आले असल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले.

भामा आसखेडचे पाणी लवकरच वडगावशेरी मतदारसंघात येईल व गेली दहा वर्षे गंभीर असलेला पाणी टंचाईचा प्रश्‍न लवकरच उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून मार्गी लागेल.
सुनील टिंगरे, आमदार

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.