लढा “करोना’शी ः महापालिकेकडून बेड मॅनेजमेंट सिस्टीम सुरू
पिंपरी (प्रतिनिधी) – शहरात करोनाने हाहाकार उडाला आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील बेड संपले असून नागरिकांना खासगी रुग्णालयात जादा पैसे देऊन उपचार घ्यावे लागत आहेत. खासगी रुग्णालयांकडून अनेकदा रुग्णांना घेण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार समोर आला होता. बेड शिल्लक असतानाही बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत रुग्णांना प्रवेश नाकारला होता. त्यासाठी महापालिकेने कक्ष स्थापन केला आहे. त्या माध्यमातून नागरिकांना रुग्णालयात बेड मिळविणे सोपे होणार आहे. यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने बेड मॅनेजमेंट सिस्टीम सुरु केली आहे. यामध्ये समन्वय अधिकाऱ्यासह चौघांची नेमणूक केली आहे.
शहरात करोना रुग्णांची संख्या दररोज एक नवीन उच्चांक गाठत आहे. तसेच मृतांचीही संख्या दिवसागणिक वाढत आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र खासगी रुग्णालयांकडून प्रशासनाला सहकार्य मिळत नाही. महापालिकेची सर्वच रुग्णालये करोनाबाधित रुग्णांनी भरली आहेत. तसेच कोविड केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांना ठेवण्यात आले आहे. वेळेवर बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. महापालिकेच्या व खासगी रुग्णालयात रुग्णांना वेळेवर बेड मिळावे यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. याकामी समन्वय अधिकारी म्हणून स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच या कक्षासाठी नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता जयकुमार गुजर, कारकून अभय चौघुले, गोविंद डाके, अरविंद पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
करोना तसेच करोना व्यतिरिक्त आजारासाठी कुठे किती बेड आहेत. किती भरले आहेत, किती रिकामे आहेत. तसेच आयसीयू, व्हेंटिलेटर यांचीही नागरिकांना माहिती उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी कॉल सेंटरची निर्मिती केली जाणार आहे. त्या माध्यमातून कुठे किती बेड आहेत याची महिती दिली जाणार आहे. यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना रुग्णालयातील बेडबाबत माहिती मिळणार आहे. यामुळे सामान्य रुग्णालाही आपल्या जवळील रुग्णालयात किती बेड आहेत याची माहिती मिळणार आहे.
रुग्णवाहिकांची सेवाही मिळणार
महापालिकेच्या वतीने रुग्णालयातील बेडसोबतच रुग्णवाहिकांच्या सेवेचे व्यवस्थापन स्वतंत्र कक्षाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून विद्युत विभागातील कार्यकारी अभियंता माणिक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासगी रुग्णवाहिकांच्या सेवा अधिग्रहित करून त्यांचे दर निश्चित करणे, कॉल सेंटर उभारणे तसेच इंधन खर्च नियंत्रित करणे आदी कामे सोपविण्यात आली आहे. यासाठी महापालिकेतील इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकारही चव्हाण यांना देण्यात आले आहे.