चोरट्यांशी हातमिळवणी करून करायचा कंपन्यात चोऱ्या
चाकण – गुन्हा कसा करायचा व दरोड्याच्या मुद्देमालाची विल्हेवाट कशी व कोठे लावायची, यास मदत करणाऱ्या चाकणच्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रम चंद्रकांत पासलकर असे या उपनिरीक्षकाचे नाव असून तो महाळुंगे इंगळे पोलीस चौकीत नेमणुकीस आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास चौकशी बालावले असता तो फरार झाला आहे.
एका गुन्ह्याचा गुन्ह्याचा तपास चाकण पोलीस करत असताना विनोद साहेबराव ठाकरे (वय 28, रा. मेदनकरवाडी), जितेंद्र रामभवन श्रीवास (वय 30, रा. आयटेल होम, चक्रेश्वर रोड, चाकण), रियाज अमीन इनामदार (वय 24, रा. ठाकूर पिंपरी, ता. खेड) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
अधिक तपास करीत असताना या गुन्ह्यात पाचपेक्षा जास्त आरोपींचा सहभाग असल्याचे उघड झाले. यात खुद्द पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर याचे नाव समोर आले. पासलकर याचे आरोपींसोबत गुन्ह्यापूर्वी व नंतर मोबाईलवर बोलणे झाले असल्याचे तांत्रिक तपासात समोर आले आहे. गुन्ह्याची उकल झाल्यानंतर पासलकर फरार आहे. दरम्यान पोलीस आयुक्तांनी या फौजदारास निलंबित केले असल्याचे सांगितले.