जामखेड (प्रतिनिधी) – शहरात व तालुक्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून येत असुन आरोळे हॉस्पिटल येथे कोरोना बाधित रुग्णांवर मोफत उपचार सुरू असल्याने तालुक्याबाहेरील रूग्ण आधार कार्ड न दाखवता खोटे नाव व पत्ता देत असुन गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर व्यक्ती गावातील नसुनही गावाचे नाव बदनाम होत असल्याने याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आधार कार्ड शिवाय कोणत्याही रूग्णाची तपासणी करू नये यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पोखरणा व तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन दिले असून तात्काळ आरोग्य विभागाला सुचना केली आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड शहरसह तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असुन कोरोना बाधित रुग्णांवर करमाळा रोड वरील आरोळे हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होते. दरम्यान मोफत उपचार असल्याने जामखेड तालुक्याबाहेरील व्यक्ती तपासणीसाठी आरोळे हॉस्पिटल येथे येत असुन आधार कार्ड न दाखवता खोटे नाव व पत्ते देत आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावात त्या नावाच्या व्यक्ती नसतानाही गावाचे नाव येत आहे त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. आतापर्यंत असे तीन ते चार व्यक्ती तालुक्याबाहेरील असुनही जामखेड तालुक्यातील खोटे नाव व पत्ते दिले आहे. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी ही बाब जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पोखरणा व तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या निदर्शनास आणून त्यांनी तातडीने आरोग्य विभागास आधार कार्ड तपासणीसाठी बंधनकारक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.