पुणे(प्रतिनिधी) : महागडे शुटींग कॅमेरे भाड्याने घेत असल्याची करत अनेकांना गंडा घालणाऱ्या भामट्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून तब्बल 7 लाख 35 हजाराचे महागडे कॅमेरे हस्तगत करण्यात आले आहेत.
संग्राम गणेश मांढरे(19,रा.नागोळा अळी, भोर,ता.भोर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी झुबेर गाझी(24,रा.अप्पर इंदिरानगर) याने फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संग्राम थोपटेने ओएलएक्सवर तात्पूरते खाते उघडून महागडे कॅमेरे भाड्याने लावून देतो अशी जाहीरात केली होती. ही जाहीरात बघून फिर्यादी गाझी व त्याचा मित्र आनंद डिकोळे यांनी आरोपी संग्रामशी संपर्क साधला.
या दोघांना संग्रामने पाच सप्टेंबर रोजी कात्रज चौकात बोलावून घेतले होते. तेथे त्यांना प्रती दीन 500 रुपये भाडे देतो असे आमिष दाखवले. यानंतर त्यांच्याकडून एक 34 हजाराचा व एक 3 लाख 20 हजाराचा असे 3 लाख 54 हजाराचे दोन कॅमेरे घेतले. यानंतर त्याने तातडीने आपले ओएलएक्स खाते बंद केले. गाझी यांनी भाड्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संग्रामने कोणताही प्रतिसाद दिला नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गाझीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील हे मंगळवारी गस्त घालत असताना, पोलीस नाईक समीर बागसिराज व हर्षल शिंदे यांना संग्राम थोपटे हा कात्रज येथील किनारा हॉटेलजवळ थांबला असल्याची खबर मिळाली. त्यानूसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झाडाझडतीत 7 लाख 35 हजाराचे आठ कॅमेरे मिळून आले.
संग्राम याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे, त्याचे आई वडिल भोरला शेती करतात. त्याला कॅमेऱ्याचे थोडेफार ज्ञान आहे. तो ओएलएक्स अॅपवर वेगवेगळ्या नावाने तात्पूरते खाते खोलत होता. फसवणूकीने कॅमेरा घेतल्यावर खाते बंद करुन मिळालेला कॅमेरा कमी किंमतीत विकत होता.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर, पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस हवालदार श्रीधर पाटील, गणेश सुतार, राजु वेगरे निलेश खोमणे, समीर बागशिराज, प्रणव सकपाळ, हर्षल शिंदे, शंकर कुंभार, शिवदत्त गायकवाड यांच्या पथकाने केली.