पुणे(प्रतिनिधी) – दूध आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात दगड घालून सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेने आरडा ओरडा केल्यावर तीच्या मदतीला नागरिक धावून येताना दिसताच आरोपीने दुचाकीवरुन पळ काढला. ही घटना लोहगाव येथील निंबाळकर नगर येथे सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी जिवनकला सरडे (55,रा.निंबाळकर नगर, लोहगाव) या दुपारी दिडच्या सुमारास दुकानात दुध आणण्यासाठी गेल्या होत्या. दुध घेऊन घरी परतत असतानाच दुचाकीवरुन मागून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना धक्का देऊन खाली पाडले. यानंतर रस्त्यावरील दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारुन गळ्यातील दिड तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे घाबरलेल्या जीवनकला यांनी आरडा ओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून काही नागरिक त्यांच्या दिशेन येत असल्याचे पहाताच चोरट्याने दुचाकीवरुन धुम ठोकली.
तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गिरी यांनी सांगितले, संबंधीत महिलेच्या डोक्याला जखम झाली असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. घटना घडलेला परिसरात कमी वस्ती आहे, तसेच सीसीटीव्ही नाहीत.