छत्रपती संभाजीनगर – आजपर्यंत पोलिसांनी अनेकांवर छापे टाकले असतील, अनेक जुगारी ताब्यात घेतले असतील. पण त्यांनी हजार-दोन हजार रुपयांचे जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र आम्ही शेतकरी पीक लावून लाखोंचा जुगार लावत असतो, त्यामुळे आम्हाला देखील अटक करा असे म्हणत आपले दुःख मांडणाऱ्या एका शेतकऱ्याचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव येथील शेतकऱ्याचा हा व्हिडिओ आहे.
जुगार खेळणे हा कायद्याने गुन्हा आहे. मी सुद्धा शेतात कांदे पिकावर जुगार खेळलो म्हणून मला जेल मध्ये टाका अशी भावनीक साद व्हिडीओत घातल्याने त्याची चांगलीच चर्चा होत आहे. पोलीस अधीक्षक मॅडम तुम्ही दररोज अवैध दारू, मटका व जुगार खेळणाऱ्यांची धरपकड करत असता,
परंतु मी काळया मातीत कांदे पिकावर तब्बल चार लाखांचा जुगार खेळलो. मात्र, अवकाळी पावसाने माझ्या 1200 क्विंटल कांद्याचा अक्षरक्ष: लाल चिखल केला आहे, त्यामुळे आता मला पण अटक करा, असे म्हणत या शेतकऱ्याने आपले दुःख व्यक्त केले आहे. तर ज्ञानेश्वर उगले (रा.बोरदहेगाव) असे नुकसाननग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
उगले हे बोरदहेगाव येथील शेतकरी असून आपल्या बंधुंसोबत एकत्रित कुटुंबात राहतात. त्यांचे सर्वच कुटुंब शेती करून आपली उपजीविका भागवत असे. दरम्यान यावर्षी त्यांनी रब्बी हंगामात साडेपाच एकर क्षेत्रावर कांदे लावले होते. मेहनतीने पिकवलेले कांदे त्यांनी शनिवार काढले. मात्र शेतात कांदे भरत असताना अचानक वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसाने काढलेले कांदे हे पूर्ण भिजले.
तर निम्म्याहून अधिक कांदे हे शेतातच असल्याने त्यांनी ट्रॅक्टर द्वारे कांदे भरण्याचा प्रयत्न केला. पण काही तासात तब्बल 1200 क्विंटल कांद्याचे डोळ्यासमोर चिखल झाले. ज्या पिकासाठी चार लाखांहुन अधिक खर्च त्याच पिकाचे डोळ्यासमोर चिखल होताना पाहून उगलेंच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी आपल्याला अटक करण्याची मागणी केली.