नवी दिल्ली -आयपीएल स्पर्धा यंदा सुरू झाल्यापासून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीवरून सातत्याने चर्चा सुरू असल्यामुळे माजी कसोटीपटू व आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने संताप व्यक्त केला आहे. निवृत्ती कधी व केव्हा घ्यायची ते एका खेळाडूनेच ठरवलेले योग्य असते व तो अधिकार आपण सगळ्यांनीच धोनीला द्यायला हवा, त्यामुळे या अनावश्यक चर्चा थांबवा, असे आवाहनही त्याने केले आहे.
चेन्नईच्या सलामीच्या लढतीपासून जवळपास प्रत्येक सामन्यासाठी मैदानावर जितके प्रेक्षक उपस्थित असतात ते पिवळी जर्सी परिधान केलेले असतात व त्यावर धोनीच्या नावाचा गजरही करतात. त्यामुळे ते धोनीला फेअरवेल देण्यासाठीच आले असावेत, असे वाटून समालोकचही धोनीची गंमत करतात. हा एक केवळ गमतीचा भाग म्हणून ठीक आहे. पण लगेच धोनी यंदाच्या मोसमानंतर आयपीएल स्पर्धेतून निवृत्ती घेणार, अशा चर्चा सुरू करणे अयोग्य आहे, असेही सेहवाग म्हणाला.
सामन्यासाठी उपस्थित असलेले समालोचकही धोनीला त्याच्या निवृत्तीवरून प्रश्न का विचारतात. त्याने पहिल्याच वेळी अशा प्रश्नांना काही अर्थ नसून मी अद्याप निवृत्तीचा विचारही केलेला नाही, असे सांगितले होते, तरीही या चर्चा का सुरू आहेत. हा निर्णय खेळाडूचाच असला पाहिजे. ज्या दिवशी धोनीला असे वाटेल की आता थांबले पाहिजे, तेव्हा तो निर्णय घेईल व त्याची माहितीही सगळ्यांना देण्यात येईल. मग आतापासूनच अशा प्रश्नांचा भडीमार कशासाठी, असा सवालही सेहवागने केला आहे.