“अर्णब प्रकरणाची चौकशी जेपीसीमार्फत व्हावी”

नवी दिल्ली -रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या वादग्रस्त व्हॉटस्‌ऍप चॅट प्रकरणाची चौकशी संयुक्‍त संसदीय समितीच्या (जेपीसी) मार्फत केली जावी, अशी मागणी कॉंग्रेसने शुक्रवारी केली. त्या मागणीचा ठराव पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत मंजूर करण्यात आला.

अर्णब चॅट प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीयतेचा भंग झालेला दिसतो. त्या कृत्यामध्ये केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ सामील असल्याचे सूचित होत आहे. त्यामुळे गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जावी. संबंधित प्रकरण चव्हाट्यावर येण्याला बरेच दिवस उलटूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकार मौन बाळगून आहे. ती बाब धक्‍कादायक आहे, अशी भूमिका ठरावातून मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाने फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून धडक कारवाई केली. त्या हवाई हल्ल्याची माहिती अर्णब यांना आधीपासूनच असावी, असे त्यांच्या चॅटमधून सूचित होत आहे.

त्यामुळे त्या प्रकरणावरून कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. लष्करी मोहिमांविषयीची गोपनीय माहिती फोडणे हा देशद्रोह आहे. ती माहिती उघड करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी त्या पक्षाने लावून धरली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.