भोसरी : चंद्रकांत पाटील यांचे रिकाम्या खुर्च्यांना संबोधन

  • भाजपाच्या राज्यस्तरीय मेळाव्यातील प्रकार; भाषण सुरू होताच सभागृह झाले रिकामे 
  • बालेकिल्ल्यातच चंद्रकांत पाटील यांच्यावर नामुष्की

पिंपरी – भाजपाचा गल्लीतील कार्यक्रम म्हटला तरी ओसंडून वाहणारी गर्दी आता नाहीसी होऊ लागल्याचा प्रकार आज राज्यस्तरीय मेळाव्यात पाहवयास मिळाला. राज्यस्तरीय मेळावा असतानाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना रिकाम्या खुर्च्यांना संबोधन करावे लागले. व्यासपीठावर नेत्यांची गर्दी आणि सभागृहातून कार्यकर्ते मात्र गायब असा प्रकार झाल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

पिंपरी-चिंचवड भाजप अनुसूचित जमाती/ आदिवासी मोर्चाच्या वतीने आज प्रदेश पदाधिकारी, कार्य समिती बैठक व मेळाव्याचे आयोजन केले होते. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात हा मेळावा बोलाविण्यात आला होता. संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बोलविल्यानंतरही लांडगे सभागृह रिकामे पहावयास मिळाले. व्यासपीठावर प्रदेश कार्यकारिणीची गर्दी असताना सभागृह मात्र ओस पडले होते.

आजच्या मेळाव्याचा शुभारंभ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर समारोप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. लांडगे सभागृहाची आसन क्षमता 950 इतकी आहे. करोनाच्या परिस्थितीमुळे आसन क्षमतेपेक्षा निम्म्या नागरिकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे हे सभागृह भरण्यासाठी अवघी 475 कार्यकर्त्यांची गरज असताना तेवढेदेखील सभागृह भरल्याचे पहावयास मिळाले नाही.

समारोपाचे भाषण ज्यावेळी पाटील यांनी सुरू केले त्यावेळी उपस्थित असलेल्या 50 ते 60 जणांनीही निघून जाणे पसंद केले. केवळ 8 ते 10 जणांच्या उपस्थितीत पाटील यांचे भाषण पार पडले. विशेष म्हणजे यातील निम्मे पत्रकारच होते. शहरात एकहाती सत्ता, दोन आमदार, राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा भरणा असतानाही रिकाम्या खुर्च्यांसमोर पाटील यांना भाषण करावे लागल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

बालेकिल्ल्यात नामुष्की
सन 2017 पासून पिंपरी-चिंचवड शहर हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकेकाळी चंद्रकांत पाटील शहरात येणार म्हणताच पन्नासहून अधिक गाड्यांचा ताफा, शेकडो कार्यकर्ते, नगरसेवक आणि पदाधिकारी असा रुबाब असताना आज भाषणही ऐकण्यास कार्यकर्ते न मिळाल्याने ही बाब नामुष्की ठरल्याचे मानले जात आहे. भाजपाला लागलेली ओहोटी की शहरांतर्गत कलहामुळे हा प्रकार घडला यावरही आता राजकीय चर्चा झडू लागल्या आहेत.

फडणवीस गेल्यानंतर ओहोटी
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सभागृहात दोन ते अडीच वाजता आले होते. यावेळी शहरातील पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे तासभर फडणवीस सभागृहात उपस्थित होते. या कालावधीत गर्दी पहावयास मिळाली.

फडणवीस सभागृहाबाहेर पडताच सभागृहातील अनेकांनी निघून जाणे पसंद केले. पाटील येत असल्याचे आयोजक सांगत असतानाही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष करत सभागृह सोडल्याने पाटील यांच्यावर रिकाम्या खुर्च्यांना संबोधन करण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.