पुणे – ‘पुण्यात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात येणार आहे,’ ही पूर्णपणे अफवा असल्याचे स्पष्टीकरण शहराचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी शुक्रवारी केले.
करोनाच्या परिस्थितीत अशा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही सह पोलीस आयुक्त डॉ. शिसवे यांनी दिला. “पुणे आणि मुंबई या दोन शहरांत शनिवारपासून लष्कर तैनात करण्यात येणार आहे. या कालावधीत संपूर्ण शहर लष्कराच्या ताब्यात असणार आहे. त्यामुळे केवळ दूध आणि भाजीपालाच उपलब्ध असेल,’ असे त्या संदेशात म्हटले आहे.
हे संदेश सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर फिरत असल्याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. शिसवे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी असा कोणताही निर्णय पुण्यात लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले.