जामखेड -तालुक्यातील जवळा व खर्डा जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये पाणीटंचाई भासू लागल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांनी पुढाकार घेतला असून गावची मागणी आली की त्यांना तात्काळ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
तालुक्यातील पोतेवाडी व चोभेवाडी येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केले असून सोनेगाव येथे तीन खासगी बोअरचालकांना ठराविक महिना देऊन पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईत गायवळ आधारवड ठरले आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील जलसाठे आटू लागले आहे. तालुक्यातील काही गावात तीव्र पाणीटंचाई भासत आहे.
प्रशासकीय पातळीवर बावी, पिंपरखेड, हळगाव, अरणगाव, कवडगाव, डोणगाव, फक्राबाद, धानोरा, रत्नापुर येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र तालुक्यातील अनेक गावातून टॅंकरची मागणी होत आहे. परंतू लालफितीमुळे ते लवकर सुरु होत नाही. त्यामुळे काही भागात अजूनही टॅंकरची प्रतीक्षा आहे.
नान्नज भागातील पोतेवाडी व चोभेवाडी येथे पाणीटंचाई जाणवत आहे.
या भागातील महिलांची पाण्यासाठी होणारी फरपट पाहून पोतेवाडीचे उपसरपंच प्रविण पोते यांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांना पिण्याच्या पाण्याची कैफियत मांडली. त्यांनी तात्काळ पोतेवाडी येथे पाण्याचा टॅंकर सुरू केला आहे.
सोनेगाव येथे तीव्र पाणीटंचाई असून तेथील खासगी तीन बोअरचालकांना ठराविक महिना देऊन नागरिकांची तहान भागवली जात आहे.
किराणा किटचे वाटप
गायवळ मुळचे सोनेगाव येथील असून व्यवसाय निमित्ताने पुणे येथे स्थायिक आहेत. गेल्या दिड महिन्यांपासून लॉकडाऊन देशात चालू आहे. जामखेड व कर्जत येथील अनेक लोक रोजगारासाठी पुणे येथे गेले आहेत. या लोकांचे हातावर पोट असल्याने उपासमारीची वेळ आली होती यावेळी गायवळ यांनी सुमारे तीन हजार धान्य व किराणा किट करून घरपोच सेवा नागरिकांना दिली आहे.