सुनील थिगळे
दावडी – रोजच्या आपल्या व्यवसायातून अनेकांचा प्रपंचाचा गाडा सुरू असतो, यातूनच काही पैशाची बचत करून संसाराचा गाडा हाकला जातो; परंतु करोनामुळे जवळपास दीड महिन्याच्या टप्यात तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढल्याने अनेक छोटे-मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. नाभिक व्यावसायिक, फूल विक्रेते, वॉशिंग सेंटर, सर्व्हिसिंग सेंटर, छोटे हॉटेल्स, टपरी चालक यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून बिकट आव्हानाचा सामना या व्यासायिकाच्या समोर उभा राहिला आहे. तसेच हे लॉकडॉऊन आणखी किती काळ चालेल याचा ही अंदाज नसल्याने या वर्गावर संक्रात आली असून उपासमारीची वेळ आली आहे.
इस्त्री, चप्पल, कापड व्यावसायिकांचे हाल
सध्या सर्व नागरिक घरीच असल्याने घरात इस्त्रीचे कपडे कोण घालणार? त्यामुळे या छोट्या व्यवसाय अडचणीत आला आहे. तर नागरिकांचे आर्थिक गणित बिघडल्याने त्याचा परिणामही या व्यवसायावर झाला आहे. त्यासोबत चप्पल दुकानेही 400पेक्षा अधिक असून एका दुकानात 2 हजार ते 10 हजारांपर्यंत होणारी उलाढाल ठप्प आहे. त्याबरोबर कपडे व्यवसायिकांनाही मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
लग्नसराई व्यवसायही गेला वाया
दिवाळी नंतर तुळशी विवाह झाल्यानंतर वर्षभरात जानेवारी ते जूनपर्यंत लहान-मोठी विवाह मुहूर्त असतात, त्याबरोबर छोटे-मोठे कार्यक्रम, उद्घाटन सोहळे, आणि यावर अवलंबून असलेले मंगल कार्यालय, जेवणासाठी केटरर्स यासारखे अनेक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.
नाभिक समाजाला सर्वाधिक फटका
करोनाचा सर्वाधिक फटका हा नाभिक व्यवसायाला बसला आहे. करोनामुळे या व्यवसायिकांनी आधीच काही काळ आपला व्यवसाय बंद केला होता. काही काळ बंद पाळून आपला व्यवसाय सुरळीत सुरू होईल या आशेने हे व्यावसायिक होते; परंतु लॉकडाऊनचा कालावधी टप्प्याने वाढला आणि आणि तो आणखी पुढे किती दिवस राहील याची खात्री नसल्याने तालुक्यातील 600 ते 700 सलून व्यावसायिक संकटात सापडले आहेत.
सर्व्हिसिंगवाल्यांचे कंबरडे मोडले
खेड तालुक्यात शेकडो सर्व्हिसिंग सेंटरची दुकाने आहेत. मुख्य रस्त्यावर या दुकांच्या समोर एरव्ही अनेक गाड्यांची रांगच्या रांग लागलेली असते. एक दुकानदार कमीत कमी 10 ते 12 गाड्यांची सर्व्हिसिंग करून देतो यातून या सर्व्हिस सेंटरच्या मालकाचे आणि तेथील कामगारांचे नियोजन असते; परंतु हा व्यवसाय ठप्प झाल्याने सर्वच नियोजन कोलमडले आहे. मालकांना बंद काळात भाडे आणि कामगारांचे वेतन कसे द्यायचे याची चिंता व्यक्त करीत आहेत.
हॉटेल बंद; रोजगार देखील बंद
तालुक्यात चहाच्या टपरीसह 700 ते 800 छोटे-मोठे हॉटेल्स आहेत. मात्र, तीही बंद असल्याने यात काम करणारे अनेक कामगार उघड्यावर आले आहेत. हॉटेल बंद झाल्याने रोजगार देखील बंद झाला आहे. एकंदरीत या छोट्या व्यवसायिकांवर करोनाचे मोठे संकट उभे केले आहे. या सर्व व्यावसायिकांना आता एकच चिंता आहे ती म्हणजे परिस्थिती कधी पूर्ववृत होईल आणि या बंद काळात आपला उदरनिर्वाह कसा करायचा.
रोजगार हिरावला
बेरोजगारीवर मात करीत स्वतःचा व्यवसाय थाटण्यासाठी लाखोंचे कर्ज घेवून फोटोग्राफी व्यवसात उतरलेल्या तरूणांवर लॉकडाउनने पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. 50 हजार ते 2 लाख रुपये गुंतवणूक करून कॅमेरे घेतले आहेत. आठ महिने कर्ज करायचे आणि या चार महिन्यात फेडायचे असे असताना त्यांचा ही रोजगार हिरावला आहे. गंभीर परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, घर भाडे, दुकान भाडे कसे भरावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.