ग्रामीण भागात मॉल वगळता सर्व दुकानांना परवानगी
मुंबई : करोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाउन सोमवारपासून (4 मेपासून) तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहे. मात्र, याला सुरूवात होण्यापूर्वी राज्य सरकारने लॉकडाउन हळूहळू शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे उद्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागात मॉल वगळता सर्व दुकाने खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
तिस-या टप्प्यातील लॉकडाउनच्या काळात काय सुरू होणार आणि काय बंद राहणार याबाबत राज्य सरकारने आज नवी नियमावली जारी केली आहे. यात अनेक गोष्टींना मुभा देण्यात आली आहे. यामुळे अनेक ठिकाणी कुरिअर सेवेसह पोस्ट सुरू होतील. याशिवाय अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सुरू होतील तसेच काही ठिकाणी खासगी व सरकारी कार्यालयांनाही परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारने नागरी भागापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आहे.
ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमध्ये असलेली खासगी आणि सरकारी कार्यालये सुरू होतील. मात्र, रेड झोनमध्ये असलेली ही कार्यालये केवळ 33 टक्के सुरू करावी लागतील. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या अशा कार्यालयांना कोणतीही मुभा नाही. तेथील कोणतीही कार्यालये सुरू होणार नाहीत. मात्र, ग्रामीण भागात मॉल वगळता सर्व दुकाने सुरू करता येणार आहे. विशेषतः अनावश्यक सेवेतील 5 दुकानंच एका गल्लीत सुरू करण्याचे बंधनातून ग्रामीण भागाला वगळण्यात आले आहे.
या गोष्टी राहणार बंदच
विमान, ट्रेन, मेट्रो किंवा आंतरराज्य रस्ते वाहतूक यांना बंदी कायम असेल. शिवाय कोणत्याही शैक्षणिक संस्था सुरू नसतील. याशिवाय कोणतेही हॉटेल्स सुरू ठेवता येणार नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारच्या सभा-संमेलन आणि धार्मिक स्थळेही सुरू ठेवता येणार नाहीत.
“रेड झोन’मधील नागरिकांनाही दिलासा
राज्य सरकारने ग्रीन आणि ऑरेंज झोन सोबतच रेड झोनमध्ये राहणाऱ्यांनाही थोडा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने आता रेडझोनमधील दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहेत. त्यात दारूच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. पण, रेड झोनमध्ये असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांसाठी ही सूट लागू नसेल. तेथील दुकाने सध्या उघडता येणार नाहीत. रेड झोनमधील दुकाने उघडताना एका लेनमधील केवळ पाच दुकाने उघडता येणार आहेत. अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानांना हा नियम असेल. मात्र अत्यावश्यक सेवेत येत असलेल्या जसे की किराणा-मेडिकल या दुकानांसाठी बंधन नाही.