केंद्रीय पथकाचा पालिकेला इशारा
पुणे – शहरातील रुग्णांची सद्य:स्थिती पाहता पुढील एक ते दीड महिन्यांत करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने रुग्णांवरील उपचारासाठी अत्यावश्यक बेडची सुविधा आणखी वाढवावी, अशा सूचना केंद्रीय पथकाने महापालिकेस केल्या. मागील दोन दिवसांपासून हे पथक पुण्यात असून माजी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह तीन जणांच्या या पथकाने महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.
शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, त्याचवेळी मृत्यूदर तसेच गंभीर रुग्णांचा आकडाही मोठा आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून घ्यावात, अशा सूचना या पथकाने दिल्या.
तर पालिकेकडून शहरात सध्या 2400 ऍक्टिव्ह केसेस असून आणखी 10 हजार बेडची उपचाराची सुविधा असल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. केंद्रीय पथकाच्या सूचनेनुसार, पुढील नियोजन हाती घेण्यात आल्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले.